

वसिम शेखचा कराटेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
नोंदवला नवा विक्रम; २० मिनिटांत ३२० ब्लॉक, ४२० पंच, ८४० बेसिक पूर्ण
गोंदवले, ता. १२ : गोंदवले खुर्द येथील अवघ्या १३ वर्षीय वसिम सादिक शेख याने अचूक, वेगवान आणि शिस्तबद्ध सादरीकरण करत अवघ्या २० मिनिटांत तब्बल ३२० ब्लॉक, ४२० पंच आणि ८४० बेसिक तंत्र पूर्ण करून त्याने कराटे क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. त्याच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गोंदवले खुर्द येथील गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालयात सातवीत शिक्षण घेणारा वसिम शेख हा लहानपणापासूनच कला आणि क्रीडा क्षेत्राशी जोडला गेलाय. त्याचे वडील सादिक शेख हे स्वतः कला अध्यापक, तसेच कराटे चॅम्पियन असल्याने घरातूनच त्याला शिस्त, मेहनत आणि क्रीडाप्रेमाचे बाळकडू मिळाले. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या आजच्या पिढीतही वसिमने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवत सातत्याने सराव सुरू ठेवला. दररोजचा कठोर सराव, अपार मेहनत आणि जिंकण्याची जिद्द यामुळेच त्याने आज जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण भारतातून तब्बल सत्तावीसशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या चुरशीच्या स्पर्धेत वसिमने आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या २० मिनिटांच्या नॉनस्टॉप सादरीकरणात त्याने सलग ४० काता पूर्ण केल्या. त्याच्या वेगवान हालचाली, अचूक तंत्र आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकही थक्क झाले. कमी वेळेत सर्वाधिक काता पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू म्हणून नवा इतिहास रचत त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत मजल मारली. त्याचे हे यश राज्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
वसीमला युनिफाईट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, आप्पा जाधव, अविनाश गोंधळी, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, अक्षय साळुंखे, डॉ. रवी पवार, विनोद माटे, विजय अवघडे, सादिक शेख, आदिनाथ शिंदे, अजिंक्य अवघडे आणि प्रेरणा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वसिमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
-------------------------------
आणखी चांगला सराव करून कराटेमधून ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही देणार आहे.
- वसीम शेख, गोंदवले खुर्द.
-----------------------------------
वसीम शेख
02647
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.