

यंदा प्रतिटन साडेपाच हजार दर द्या
राजू शेट्टींचा ऊस परिषदेत इशारा : अन्यथा मंगळवारी महामार्ग रोखणार
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : ‘‘या वर्षी तुटणाऱ्या उसाला कारखान्यांनी पाच हजार रुपये दर, तर केंद्र सरकारने पाचशे रुपयांचे अनुदान असे प्रतिटन साडेपाच हजार रुपये द्यावेत; अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे दिला.
साखर आणि इथेनॉल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १२) दिल्लीत होणाऱ्या संयुक्त बैठकीत साखरेला किमान हमीभाव पन्नास रुपये व सी हेव्ही इथेनॉल प्रतिलिटर ७० रुपये दरवाढीवर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर मंगळवारपासून (ता. १३) महाराष्ट्र, कर्नाटकातील महामार्ग बेमुदत रोखण्याचा थेट इशाराही शेट्टी यांनी सरकारला दिला. जयसिंगपूर पालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर आयोजित २५ व्या रौप्यमहोत्सवी ऊस परिषदेत ते बोलत होते. रेठरे हरणाक्ष येथील शिवाजी मोरे अध्यक्षस्थानी होते.
शेट्टी म्हणाले, ‘‘दसरा, दिवाळीच्या तोंडावर निर्माण झालेल्या साखर टंचाईमुळे केंद्र सरकारची मान आता शेतकऱ्यांच्या हातात सापडली आहे. आता सोडायचे नाही. तीस लाख टन साखरेची चोरी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी २९१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ५० लाख टन साखर शिल्लक, दहा लाख टन साखर निर्यात केली. २७२ लाख टन साखर टप्प्याटप्प्याने बाजारात आणली. अशा स्थितीत ४२ लाख टन साखर साठा शिल्लक असायला हवा होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक याच राज्यातून सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते. आता तीन राज्यातील शेतकरीच आपला ऊस कधी घालवायचा, हे ठरवतील. कारखाने शेतकऱ्यांच्या बापाचे आहेत. आम्हाला शहाणपण शिकवायचे नाही. टनाला आठशे रुपयांचे नुकसान सोसून ऊसतोड करून देणार नाही. अद्याप उसाची वाढ झाली नाही. त्यामुळे महिनाभर थांबणे शक्य आहे.’’
‘अपहरण, विनयभंगाचे गुन्हे बाकी’
शेट्टी म्हणाले, ‘‘आजवर आंदोलने करताना अपहरण आणि विनयभंगाचे गुन्हे वगळता सर्व गुन्हे दाखल झाले.‘देवा भाऊ’च्या कृपेने हे देखील दाखल होतात का ते पाहू या?.’’
कारखानदारांवर दिल्लीतून दबाव
कारखाने येत्या १५ पासून सुरू करावेत, यासाठी दिल्लीतून कारखानदारांवर दबाव येत आहेत. दबावाला बळी पडून कारखानदारांनी चुकीचा निर्णय घेतल्यास त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.