बेळगाव ः विमानसेवा

बेळगाव ः विमानसेवा

Published on

बेळगाव-मुंबई विमानसेवा बंद
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. २७ : वर्षअखेरीस बेळगावकरांना मोठा धक्का बसला असून बेळगाव-मुंबई दरम्यानची विमानसेवा २६ डिसेंबरपासून अधिकृतरीत्या बंद करण्यात आली आहे. चांगला प्रतिसाद असतानाही ही विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी बेळगाव विमानतळावरून १२ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होती. मात्र टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवरील सेवा बंद होत गेल्याने आता ही संख्या केवळ पाच शहरांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात आणखी विमानसेवा बंद होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या बेळगाव येथून इंडिगो एअरलाइन्सकडून बंगळूर, हैदराबाद आणि नवी दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तसेच स्टार एअरकडून अहमदाबाद व जयपूर या दोन शहरांसाठी सेवा उपलब्ध आहे. मात्र याच स्टार एअरने बेळगाव–मुंबई ही महत्त्वाची विमानसेवा बंद केल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी आपले तिकीट बुकिंग बंद केले होते. बेळगावातील व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार तसेच वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही विमानसेवा महत्त्वाची होती. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर करत असतानाही सेवा बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेळगावातून यापूर्वी तिरुपती, पुणे, सुरत, इंदूर आणि नागपूर या शहरांसाठीच्या विमानसेवाही बंद केल्या होत्या. या सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र आजपर्यंत त्यापैकी एकही सेवा पुन्हा सुरू झालेली नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com