कास - ऐतिहासिक जावळीच्या नावाला गालबोट.....

कास - ऐतिहासिक जावळीच्या नावाला गालबोट.....

Published on

ऐतिहासिक जावळीच्या नावाला गालबोट

ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे ग्रामीण भागात पोहोचल्याने प्रश्नचिन्ह

कास, ता. १४ ः जावळी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. याच ऐतिहासिक जावळीच नाव राज्यभर गेले, तेही नको त्या कारणाने. तालुक्यातील सावरी या छोट्याशा गावात कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्ज व ते बनवण्याचे साहित्य सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मुंबईच्या गुन्हे शाखेने थेट कारवाई करत छोट्याशा शेडवजा घरातील हा कारखाना उद्ध्वस्त केल्याने सर्वांच्या नजरा इकडे वळल्या.
सर्वांना आश्चर्य वाटतंय ते म्हणजे जावळीतील या छोट्याशा गावात तीन परप्रांतीय नागरिक येऊन राहतात काय? ड्रग्जसारखे नशेली पदार्थ बनवतात काय? पण याचा पत्ता कोणाला लागत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच बाहेरील नागरिक अशा दुर्गम भागात येऊन राहण्यासाठी त्यांना स्थानिक कोणाचातरी आधार, पाठिंबा असल्याशिवाय एवढे साहस ते करू शकत नाहीत. त्यामुळे राज्य पातळीवरील जावळीचे नाव बदनाम करणारे हे घरभेदी पुढे आणून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.
जावळी हा शांतताप्रिय व राज्यातील दारूमुक्त दुकानांचा तालुका म्हणून ओळखला जातो. बामणोली परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे येथील कोयना जलाशयाचे विहंगम पात्र व सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात; परंतु अशा दुर्गम भागाची निवड ड्रग्जसारखा पदार्थ बनवण्यासाठी केल्याने या भागाच्या नावालाही गालबोट लागले आहे. १०० कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज सापडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असून, जावळीत अशी घटना घडल्याने कोणाच्या आशीर्वादाने हे धागेदोरे इथपर्यंत आले याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

-------------------------------

प्रशासनाचा वचक हवा
सद्यःस्थितीत तीन बंगाली बांगलादेशी नागरिकांना अटक करून मुंबईला नेण्यात आले. ज्या सावरीत ही घटना घडली तेथील संबंधित जागा मालक, ही जागा त्या परदेशी नागरिकांना दाखविणारा स्थानिक मास्टरमाइंड यांना याची कल्पना नव्हती, की त्यांनी जाणून बुजून पैशाच्या हव्यासापोटी या गोष्टींना मूक सहमती देऊन या रॅकेटमध्ये सहभाग घेतला. एकूणच शांतता प्रिय जावळीची ह्या ड्रग्ज प्रकरणात मोठी बदनामी झाली असून, यापुढे कायद्याला न जुमानणाऱ्या अशा महाभागांवर प्रशासनाने वचक ठेवून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी समस्त जावळीकरांमधून होत आहे.

-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com