
अवसरीत उसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिले
मंचर, ता. १५ ः अवसरी खुर्द, मंचर (ता. आंबेगाव) येथील शेतकरी उत्तम सावळेराम शिंदे यांच्या उसाच्या शेतात चार बिबट्याची पिले आढळून आली. उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याची पिले दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता भीतीपोटी त्यांनी तेथून धूम ठोकली.
या परिसरात शासकीय अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असून, वसतिगृहात जवळपास दीड हजार विद्यार्थी मुक्कामी असतात, मात्र बिबट्या व पिलांचा वावर असल्याची माहिती समजल्यानंतर रात्री महाविद्यालय परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता.
दरम्यान, मंचर वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस व वनपाल संभाजीराव गायकवाड यांनी या भागात गस्त घालत जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी, तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याबाबतही कार्यवाही करण्याचे काम वनखात्याने सुरू केले असल्याचे राजहंस यांनी नमूद केले.
-----------
मंचर ः उत्तम सावळेराम शिंदे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची पिले आढळून आली.