लांडेवाडीतील नाटिकेची जिल्हास्तरावर निवड
मंचर, ता. २८ : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धा झाल्या. स्पर्धेत १२ शाळांनी भाग घेतला. राजपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ऑफलाइनचा दिवस माझ्या आवडीचा’ या नाटिकेचा प्रथम क्रमांक आला. या नाटिकेची निवड जिल्हास्तरावरील नाट्य स्पर्धेसाठी झाली आहे.
या नाटकातील बालकलाकार साक्षी केंगले व प्रवीण बांबळे यांना उत्कृष्ट अभिनयासाठी गौरविण्यात आले. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन साधना राक्षे-भेके यांनी केले. त्यामुळे त्यांची सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नेपथ्य आणि पार्श्वसंगीत प्रफुल्ल गव्हाड, रेखा पोपळघट, राजू केंगले यांनी दिले अशी माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण देवकर यांनी दिली.
विजेत्यांची नावे द्वितीय क्रमांक विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक, तृतीय शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय लांडेवाडी. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुख्याध्यापक राजू आढळराव पाटील, हनुमंत कुबडे, मुरलीधर मांजरे, नामदेव पडधुणे यांनी काम पहिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी राजपूर आश्रम शाळेतील बालकलाकार, मार्गदर्शक शिक्षक नवनाथ भवारी, सचिन लांडे, कैलास डाके, भागवत भंगे यांचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

