वेण्णा लेक रस्त्यावर अपघात; तरुण जखमी, जबाबदारी कोणाची?
मोठे खड्डे, खचलेली भिंत ठरतेय जीवघेणी
महाबळेश्वर- वेण्णा लेक रस्त्यावरील स्थिती; प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
महाबळेश्वर, ता. १५ ः येथील वेण्णा लेक रस्त्यावरील प्रतापसिंह उद्यानालगतची संरक्षक भिंत जागोजागी खचल्याने आणि काही ठिकाणी रस्ताही ढासळू लागल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः रात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, अपघात घडल्यास जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत नागरिकांना असुरक्षित रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. सुरूर ते पोलादपूर मार्गावर ठिकठिकाणी काम सुरू असून, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी परिसरात कामाची सुरुवात झाली आहे; मात्र, महाबळेश्वर परिसरात हे काम येण्यासाठी तीन ते चार महिने किंवा जास्त कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या प्रतापसिंह उद्यानालगतच्या संपूर्ण भिंतीची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता देखील खचू लागला आहे. पालिकेच्या सुशोभीकरणाच्या कामात नवीन पथदिवे बसविण्यात आले असले, तरी ते सगळे अजून सुरू झाले नसल्याने रात्री अंधारातच अंदाज घेत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी असते.
शहरातून सध्या पाचगणी, वाई, पुण्याकडे जाण्यासाठी सोयीचा हा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता खचल्यास वाहतूक वळविणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे, तसेच या रस्त्याच्या कडेला असलेला पदपथावरून देखील शहरातील नागरिक व पर्यटक नेहमीच चालत जाण्यासाठी वापर करत असतात. पहाटे फिरणाऱ्यांसाठी देखील हा पदपथ सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने पदपथाची रुंदी उपयुक्त असावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून होत आहे.
नवीन रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच एखादा गंभीर अपघात परिसरात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, याबाबत संबंधित खात्याने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. काम सुरू करण्याअगोदर माहितीचा फलक सर्व तपशीलांसह संबंधित खात्याने लावावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बावळेकर यांच्या प्रकरणात संबंधित खात्याने संवेदनशीलता दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारून आर्थिक व शारीरिक नुकसानीची भरपाई द्यावी आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर पडलेला आर्थिक बोजा हलका करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
------------------------
शेतकऱ्याच्या पायाला इजा
नुकताच वेण्णा लेक परिसरातील शेतकरी सुनील बावळेकर (वय ४३) यांचा दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली. त्यामुळे किमान सहा महिने त्यांच्यावर अंथरुणावर राहण्याची वेळ आली आहे. रस्त्यामधील मोठे खड्डे आणि संरक्षक भिंतीची ढासळलेली स्थिती यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
--------------------------
कोट
वेण्णा लेक- महाबळेश्वर रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. त्याठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन किमान मोठे खड्डे तात्पुरते भरून घेतले पाहिजेत, तसेच रेडियमचा वापर करून धोकादायक ठिकाणी सूचना फलक उभे केले पाहिजेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत.
- संतोष जाधव, व्यावसायिक, महाबळेश्वर.
----------------------------
04804, 04805
महाबळेश्वर : येथील रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे व तुटलेले कठडे.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

