महाबळेश्वर येथे प्रचारात आघाडी

महाबळेश्वर येथे प्रचारात आघाडी

Published on

महाबळेश्वरमध्ये प्रचाराला आली रंगत

रॅलीसह कोपरा सभांनी ढवळले वातावरण; सर्व पक्ष, आघाड्या रस्त्यावर

महाबळेश्वर, ता. १५ ः येथील पालिकेच्या निवडणूक प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, रॅली, कोपरा सभा, रिक्षांवरील स्पीकर, डिजिटल स्क्रीन असलेल्या प्रचार व्हॅनमुळे शहर ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष व आघाड्यांचे उमेदवार रस्त्यावर उतरले असून, प्रचाराचे चित्र रंगतदार झाले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची बाजारपेठेतून काढलेली प्रचार रॅली, तसेच लोकमित्र जनसेवा आघाडीची पारंपरिक वासुदेव रॅली मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. दोन्ही रॅलींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उमेदवारी अर्जांवरील आक्षेपांमुळे निवडणूक प्रक्रिया काही काळ लांबल्याने प्रचार थंडावला होता. मात्र, निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा प्रचाराला जोर चढला आहे. पर्यटननगरी असलेल्या महाबळेश्वरमध्ये उमेदवारांच्या गाठीभेटी, घोषणा आणि रॅलींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे, प्रभाग क्रमांक तीनमधील विमल पार्टे व विशाल तोष्णीवाल, तर प्रभाग क्रमांक पाचमधील अपर्णा सलागरे व ॲड. संजय जंगम यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत समर्थन मागितले, तर कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
हेवे- दावे नव्हे, तर विकासाला प्राधान्य देणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. चुकीच्या नेतृत्वामुळे मागील आठ वर्षे शहर विकासापासून वंचित राहिले. हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठोस प्रयत्न केले जातील, असे आवाहन सुनील शिंदे यांनी केले.
लोकमित्र जनसेवा आघाडीचे योगेश बावळेकर यांनी मागील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सांगितले, की मागील वेळी विकासाचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली गेली. मात्र, पाच वर्षांत एकही ठोस विकासकाम झाले नाही. त्यामुळे नागरिकांची निराशा झाली आहे. यावेळी महाबळेश्वरकर तीच चूक करणार नाहीत.
महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याने येथील प्रश्न वेगळे असल्याचेही प्रचारात अधोरेखित करण्यात येत आहे. अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या नंदनवनाचे नेमके काय झाले? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येऊन पुढील पाच वर्षांत नावीन्यपूर्ण योजना राबवून शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, तसेच स्थानिक युवकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक पटवेकर यांनी दिली.

-----------------------------


वासुदेवांची स्वारी
लोकमित्र जनसेवा आघाडीच्या वतीने आज पहाटे पारंपरिक वासुदेव रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डी. एम. बावळेकर यांच्या प्रचारासाठी १० वासुदेवांनी टाळ वाजवत, प्रचारगीते गात शहरातील सर्व प्रभागांतून फेरफटका मारला. पांढरा पोशाख, मोरपिसाची टोपी, तिरंगी मफलर आणि हातात टाळ अशी वेशभूषा असलेल्या या अनोख्या प्रचार पद्धतीने अनेक महाबळेश्वरकरांची सकाळ जागी झाली. या वेगळ्या संकल्पनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

----------------------------------
04807, 04808
महाबळेश्वर ः नगराध्यक्षपदाचे उमेदवार डी. एम. बावळेकर यांच्या प्रचारासाठी सकाळी शहरातून फेरफटका मारताना वासुदेव. दुसऱ्या छायाचित्रात शहराच्या मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारार्थ काढलेली रॅली.

------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com