
ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
मुंबई, ता. ११ ः ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी (वय ८८) यांचे आज रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. उद्या (ता. १२) सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
गेली ५० वर्षे नाडकर्णी हे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. शेकडो नाटकांवर त्यांनी लेखन केले आहे. उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी ‘महानगरी नाटक’, ‘राजा छत्रपती’ (बालनाट्य), ‘नाटकी नाटक’ ही पुस्तके लिहिली आहेत. नाडकर्णी सुरवातीच्या काळात सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत १५ वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. नाट्यसंहिता वाचून, बारकावे शोधून ते प्रयोगाच्या मर्यादा दाखवत असतं. त्यांची शीर्षके बोलकी असतं. ‘चंद्रलेखा’च्या ‘स्वामी’ नाटकाचे त्यांनी ‘शनिवारवाड्याचा स्वामी’ आणि ‘रविवारवाड्याचा स्वामी’ अशा दोन भागांत परीक्षण लिहिले होते. नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ चा जीवनगौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. आपल्या परखड लेखनाने नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय समीक्षेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. काही काळ त्यांनी चित्रपट समीक्षाही केली होती.