पुणे जिल्ह्यासाठी ५० हजार कोटी ः गडकरी पुणे-छत्रपती संभाजीनगरदरम्यान द्रुतगती मार्गाला १६ हजार कोटी

पुणे जिल्ह्यासाठी ५० हजार कोटी ः गडकरी  
पुणे-छत्रपती संभाजीनगरदरम्यान द्रुतगती मार्गाला १६ हजार कोटी
Published on

नागपूर, ता. १३ ः आगामी वर्षभरात महाराष्ट्रासाठी तब्बल दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, यातील ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. शनिवारी (ता. १३) विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली.
गडकरी म्हणाले, ‘‘पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा नवीन एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा राहणार असून, मार्गाची दुरुस्ती तसेच उड्डाणपूल उभारणीसाठी दोन हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून जाणारा दुसरा रस्ताही विकसित करण्यात येणार असून, या मार्गावर केवळ टोलचे काम शिल्लक आहे. या ‘एक्स्प्रेस वे’मुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या दोन तासांत तर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर अडीच ते पावणे तीन तासांत गाठणे शक्य होणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्पांतर्गत चार स्तरावरील (खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो) ४ हजार २०७ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. हडपसर ते यवत दरम्यान ५ हजार २६२ कोटी रुपयांचा एलिव्हेटेड प्रकल्प प्रस्तावित असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला कॅबिनेटची मान्यता मिळाली आहे. तसेच कळंबोली विकास प्रकल्पासाठी ७७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ही कामे ‘एमएसआयडीसी’कडे देण्यात आली आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यासाठी जवळपास ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, ही सर्व कामे येत्या तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर-काटोल सेक्शनमध्ये काटोल-जाम बायपास, नागपूर-भंडारा सेक्शन सिक्स लेन ३ हजार कोटीच्या कामांचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

९३ टक्के भूसंपादन पूर्ण
नाशिक फाटा ते खेड हा मार्ग दोन टप्प्यांत विकसित करण्यात येणार असून, यासाठी ९३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा ते आळंदी फाटा हा ४ हजार ४०३ कोटींचा, तर दुसऱ्या टप्प्यात आळंदी फाटा ते खेड हा ३ हजार ३९८ कोटींचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याशिवाय जुने पुणे नाका ते सातारा चौक दरम्यान नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, वेस्टर्ली बायपास ते पुणे–सातारा रस्त्यासाठी नवीन डीपीआर तयार करण्यात येणार आहे. साडे सहा ते सात हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, त्यामध्येही नवीन उड्डाणपूल उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
फोटो ः 98202

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com