मनीषाताईंच्या नृत्यातून ब्रम्हानंदाची अनुभूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनीषाताईंच्या नृत्यातून ब्रम्हानंदाची अनुभूती
मनीषाताईंच्या नृत्यातून ब्रम्हानंदाची अनुभूती

मनीषाताईंच्या नृत्यातून ब्रम्हानंदाची अनुभूती

sakal_logo
By

कोथरूड, ता. २७ : ‘मनीषाताईंचे नृत्य म्हणजे अद्भुत आविष्कार आहे आणि हे संपूच नये असे वाटत होते. आज इथे जमलेल्या प्रत्येकाला त्यांच्या नृत्यातून ब्रम्हानंद अनुभवता आला. पं. गोपीकृष्ण यांची आठवण त्यांनी नृत्यातून करून दिली, अशा शब्दांत विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी ज्येष्ठ नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांचा गौरव केला.

कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य गुरु पं. मनीषा साठे यांचा सत्कार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ‘मनीषा नृत्यालय परिवार’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. या वेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘‘ताईंचा ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. पण, त्यांचे नृत्य पाहताना वाटले कलावंतांना वय नसते, तर कलेला वय असते. त्या एक व्यक्ती नसून एक संस्था आहात.’’

या कार्यक्रमात पं. मनीषा साठे यांनी ‘नृत्यार्पिता’ हे बहारदार एकल नृत्य सादरीकरण केले. त्यांना निखिल पाठक, राजीव तांबे, सुनील अवचट, वल्लरी आपटे यांनी साथसंगत केली. अशोक वैशंपायन गुरुजी यांनी वेद मंत्रातून अभिष्टचिंतन केले. शांभवी दांडेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले. ‘नृत्यार्पिता’ सादरीकरणातून पं. मनीषा साठे यांनी प्रारंभी शिववंदना, ताल, नायिका भेद, द्रूत त्रिताल तसेच ‘मोहे मना लाग्यो छंद’ हे भजन सादर केले. या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी टाळयांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मधुरा आफळे, निखिल फाटक यांनी पं. मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत घेतली.

डिसेंबरमध्ये नृत्य रोहिणी महोत्सव
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, फक्त नृत्यासाठी एक थिएटर असावे अशी सर्व नृत्यगुरूंची इच्छा होती, त्या प्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चार एकर जागा दिली आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल. तसेच सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे नृत्य महोत्सव सुरू व्हावा यासाठी ‘नृत्य रोहिणी महोत्सव’ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल. नोव्हेंबर २०२३ पासून रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांच्या नावाने हा महोत्सव सुरू होईल.

सोहळ्याने भारावले!
सत्काराला उत्तर देताना पं. मनीषा साठे म्हणाल्या, ‘‘या सोहळ्याने मी भारावून गेले आहे. गेली ६२ वर्ष मी नृत्याला दिली. या मागे गुरू पं. गोपीकृष्ण, आई वडील, गुरू यांचे आशीर्वाद आहेत. रसिकांच्या सदिच्छा आहेत.’’