मनःशांतीचे जीवन जगण्यासाठी तल्लीन व्हा!

मनःशांतीचे जीवन जगण्यासाठी तल्लीन व्हा!

कोथरूड, ता. १६ : ‘‘आभासी जगात एकमेकांकडे बघून बोलण्याचे प्रमाण कमी झाले असून, संवादातील भावना हरवत चालली आहे. आनंद अनुभवण्यापेक्षा तो नोंदविण्यावर, तसेच एखाद्या कलाकृतीत तल्लीन होण्याऐवजी बेभान होण्याकडे आपला अधिक कल असतो. तणावमुक्त, मनःशांतीचे जीवन जगण्यासाठी बेभान न होता तल्लीन होऊन आनंदानुभूती घ्यावी,’’ असे प्रतिपादन दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक डॉ. सलिल कुलकर्णी यांनी केले.

समवेदना संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. कुलकर्णी यांच्या ‘मना तुझे मनोगत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी यांनी पालकत्व, मुलांशी संवाद, नातेसंबंध व कथाकथन अशा विविध विषयांवर गप्पा, संगीत, गाणी व कवितांच्या माध्यमातून त्यांच्या अनोख्या शैलीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रद्धा कुलकर्णी यांनी डॉ. कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत घेतली.

मयूर कॉलनीतील एमईएस बालशिक्षण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ होते. या प्रसंगी ‘समवेदना’चे संस्थापक डॉ. चारुदत्त आपटे, विश्वस्त प्रकाश तुळपुळे, सल्लागार राजीव साबडे, ज्येष्ठ सदस्य बापू पोतदार, मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘संवादात भावनेला, सहजतेला खूप महत्त्व आहे. आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून नकळतपणे सांगितलेल्या गोष्टीतून संस्कार होतात. अनुभवी लोकांनी पुढच्या पिढीतील लोकांना चांगल्या गोष्टी सांगायला हव्यात. आधीच्या पिढीने भान सांभाळले पाहिजे. तर्क सांगितले पाहिजेत. दोन पिढ्यांमधील दोन माणसांचे नाते ओघवते, सहज व आत्मीयतेचे असावे.’’
अमर पवार यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शरयू जावळे यांनी आभार मानले.
-----------------
कोथरूड ः डॉ. सलिल कुलकर्णी यांची मुलाखत घेताना श्रद्धा कुलकर्णी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com