कोथरूड

कोथरूड

जबाबदार कोण? मेलेला सायकलपटू की मेलेली व्यवस्था ?
सायकलींच्या पुण्यात देवळी यांच्या मृत्यूमुळे हळहळ आणि निषेधही
कोथरूड, ता. १ ः कर्वे रस्त्यावर पदपथ व सायकलमार्गाचे काम सुरु आहे, मात्र येथील सायकलींसाठीचा मार्ग सायकल चालविण्यास योग्य नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करीत शहरातील सायकलपटूंनी शनिवारी झालेल्या दुर्घटनेचा निषेध केला. कृष्णा गणपत देवळी यांच्या मृत्यूमुळे सायकलपटू एकीकडे हळहळ व्यक्त करीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाच्या पातळीवरील नियोजनाच्या अभावाचाही त्यांनी निषेध केला आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण, मेलेला सायकलपटू की मेलेली व्यवस्था असा संतप्त सवाल सायकलपटूंनी केला.
एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सायकलपटू उपेक्षितच राहात असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली सायकलपटू संतोष प्रकाश गोरडे म्हणाले की, ‘‘एका सायकलपटूचा असा मृत्यू ही खूपच वाईट बातमी आहे. आपल्या पुण्यात आम्हाला सायकल ट्रॅक शोधावे लागतात, कारण अनेक ठिकाणी त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. मुळात सायकल ट्रॅकचे बांधकाम दर्जेदार नाही. त्यावरून अनेक लोक गाड्या चालवितात. अनेक ठिकाणी दुचाकी, चार चाकी पार्कही केलेल्या असतात. अनेक रस्त्यांवर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळेच असे अपघात होतात.’’
राज तांबोळी म्हणाले की, ‘‘सायकलपटू राइड मारताना नेहमी हेल्मेट घालतात. सायकलला पुढे आणि मागे चमकणारे लाइटही लावलेले असतात. त्यामुळे मागून किंवा पुढून येणाऱ्या प्रत्येकाला सायकलपटू लांबूनच दिसणे अपेक्षित आहे. तरी सुद्धा वाहनचालक अजिबात लक्ष देत नाहीत आणि गाड्या कशाही चालवतात.’’
राकेश धोत्रे म्हणाले की, ‘‘पुणे महापालिकेने प्रत्येक सायकलपटूला किमान दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे. दर दहा दिवसांनी रस्त्यांची पाहणी करावी. यासाठी आम्ही सगळे सायकलपटू सहकार्य करू. आम्ही सायकल चालवून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतो.’’
प्रा. संदीप पवार म्हणाले की, ‘‘विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी सायकलपटूंनी सायकल चालवावी की नाही असा प्रश्न या दुर्घटनेमुळे निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी रस्ते लहान व वाहनांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. महानगरपालिकेच्यावतीने तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे ऑडिट होणे गरजेचे आहे.’’
गणेश मारणे म्हणाले की, ‘‘वाहतूक पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अवजड व वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या वाहनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सायकलपटूंनीही आपल्या सायकलचे ब्रेक लागतात की नाही हे तपासून वेळोवेळी घेणे गरजेचे आहे.’’
शिवाजी शेळके म्हणाले की, ‘‘कर्वे रस्त्यावर सध्या पदपथ व सायकल मार्गाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता आता अरुंद झाला असून वाहनांची संख्या सकाळ व संध्याकाळच्या वेळेस जास्त असते. उड्डाणपुलावरून वेगाने गाड्या येत असतात. अशा वेळी सायकलपटूंना रस्त्यावरून सायकल चालविणे दिवसेंदिवस अवघड बनत आहे.’’
---
‘स्मार्ट सिटीच्या नावाखाली मूर्खपणा
प्रशांत वेलणकर म्हणाले की, ‘‘स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ता कमी करून पदपथ वाढवण्याचा कर्वे रस्त्यावर जो प्रयत्न सुरु आहे तो मूर्खपणा आहे. उड्डाणपुलावरून वाहने वेगाने येतात. स्वातंत्र्यवीर मित्र मंडळ चौकात हिरवा सिग्नल मिळाला की वाहने वेगाने पुढे जातात. तेथे लगेचच बस थांबा आहे. थांब्यावर बस उभी असेल तर मागे वाहनांच्या रांगा लागतात. यातून मार्ग काढणे वाहनचालकांसाठी अवघड बनते. पदपथ दुरुस्तीचा राडारोडा सुद्धा रस्त्यावर असल्यामुळे वाहनचालकांची अडचण होते.’’
-----
सायकलपटूंचे मुख्य मुद्दे
१) सायकल ट्रॅकवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक शोधावा लागतो
२) अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर दुचाकी किंवा चार चाकी पार्क केलेल्या असतात
३) अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचे बांधकाम दर्जेदार नाही
४) पुणे महापालिकेने प्रत्येक सायकलपटूला दहा लाख रुपयांचे विमाकवच द्यावे
५) सायकल ट्रॅकच्या कामाचे ऑडिट करावे
६) वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी

-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com