क्रेनच्या धडकेने सायकलस्वाराचा बळी

क्रेनच्या धडकेने सायकलस्वाराचा बळी

पुणे/कोथरूड, ता. १ : भरधाव क्रेनने चिरडल्याने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (ता. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील कल्याण ज्वेलर्स शोरुमजवळ घडली.
कृष्णा गणपत देवळी (वय, ६६, रा. धारेश्वर पार्क, आनंदनगर, सनसिटी रस्ता) असे मृताचे नाव आहे. ते पाटबंधारे विभागात अभियंता होते. सेवानिवृत्तीनंतर तंदुरुस्तीसाठी त्यांनी सायकलिंगचा छंद जोपासला होता.
या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी जयश्री ठाकरे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून क्रेनचालक सलामत अली जाहिद अली (वय २६, रा. वडगाव बुद्रूक, मूळ रा. भटीइभाट, उत्तर प्रदेश) पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, मोटार व्हेईकल ॲक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक विपिन हसबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळी सकाळी खंडोजीबाबा चौकाच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी क्रेनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून सायकलला बाजूने धडक दिली. त्यात देवळी गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या क्रेनचे आरटीओ कार्यालयाकडून पासिंग झालेले नाही. फोलिसांनी संबंधितांकडून कागदपत्रे मागवली असून आरटीओला कळविण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शी राजेंद्र नेवासकर, केतन दहिभाते यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर कर्वे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. आम्ही रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवला. रक्ताने माखलेल्या रस्त्यावर माती टाकण्यात आली. तेथील सगळे दृश्य हेलावून टाकणारे होते.

नागरिक संतप्त
पुणे शहरात अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत. त्यात नागरिकांचे बळी जात आहेत. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
-----
‘थरकाप उडाला’
प्रत्यक्षदर्शी गणेश शेराल यांनी सांगितले की, ‘क्रेनचालक कर्वे रस्त्यावरून डेक्कनच्या दिशेने भरधाव निघाला होता. क्रेनच्या धडकेने देवळी खाली पडले. त्यानंतर क्रेनच्या चाकाखाली ते चिरडले गेले. ही दुर्घटना पाहून थरकाप उडाला.’
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com