कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

पुणे/कोथरूड, ता. २ : सायकलपटूच्या मृत्यूने रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताची घटना दुर्दैवी असून, आता तरी अपघात टाळण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कर्वे रस्त्यावरील कल्याण ज्वेलर्स शोरुमजवळ शनिवारी सकाळी भरधाव क्रेनने चिरडल्याने सायकलपटू कृष्णा गणपत देवळी (वय, ६६, रा. आनंदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात होत असलेल्या अपघातांबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्वे रस्ता सुरक्षा समितीचे उमेश कंधारे म्हणाले, ‘‘सुरक्षा समितीने वेळोवेळी मागण्या करून कर्वे रस्त्यावरील वाहतूक समस्यांबाबत आवाज उठवला आहे. परंतु अजूनही प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.’’

कर्वे रस्ता सुरक्षा समितीच्या मागण्या-
१) वाहनांच्या पार्किंगसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी.
२) कर्वे रस्त्याला समांतर असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे.
३) नागरिकांना रस्ता सुरक्षित ओलांडण्याची व्यवस्था करावी.
४) मेट्रोच्या कामासाठी आलेल्या वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावावी.
५) कर्वे रस्त्यावर पदपथाचे काम सुरु आहे. त्यासाठी सुरक्षेचे नियम पाळले जावेत.
६) कर्वे रस्त्यावर वाहिन्यांसाठी खोदाई झाल्यानंतर रस्ता दुरुस्ती करावी.
७) डंपर, मिक्सर अशा अवजड वाहनांची वेळोवेळी तपासणी करावी.
८) उलट दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
९) वाहतूक पोलिस, वॉर्डनची संख्या वाढवावी.

एसएनडीटी चौकातील अतिक्रमण हटवा
एसएनडीटी येथे मेट्रो पुलाखाली बसथांबा केला आहे. तेथे रिक्षा थांबा आणि रस्त्यावर लावलेल्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडी होते. कॅनॉल रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे. हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवावा. रिक्षा थांबा कर्वे रस्त्याला लागून न ठेवता पुढे करावा. एसएनडीटी चौकातील पदपथावरील अतिक्रमण हटवून हा चौक वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


पासिंग झाले; पण क्रेन विनानंबर प्लेट
कर्वे रस्त्यावर सायकलपटूच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली क्रेन ही नवीन होती. तिचे रीतसर सर्व परवाने होते, अशी माहिती डेक्कन ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गुन्हे) शंकर साळुंखे यांनी दिली. ते म्हणाले, ही क्रेन सोहराब अन्सारी यांच्या मालकीची आहे. क्रेनचे २५ मे रोजी आरटीओ पासिंग झाले आहे. ही नवीन क्रेन प्रथमच कामासाठी रस्त्यावर आणली होती. परंतु कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच अपघात झाला. अपघातानंतर क्रेनची कागदपत्रे मागवून घेतली आहेत. क्रेनला नंबर मिळाला होता. परंतु नंबर प्लेट कंपनीकडे गेल्यावर ती साधारणपणे आठवड्याने मिळते. त्यामुळे क्रेनला नंबर प्लेट दिसत नाही.

सेवानिवृत्त अभियंता कृष्णा देवळी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी वाचून मन विषण्ण झाले. सध्या दुचाकी किंवा सायकल चालवणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. वाहतूक पोलिस हा प्रकार अस्तित्वातच राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे रस्त्यावर जरा तरी शिस्त येऊ शकते. टँकर, क्रेन अशा दैत्यरुपी मोठ्या वाहनांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. वेगाचे नियंत्रण कोण ठेवणार, त्यांच्यावर अंकुश कोण लावणार? अपघात टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने अधिक कार्यक्षम होणे गरजेचे आहे. आम्ही कृष्णा देवळी हा हरहुन्नरी सायकलपटू गमावला. त्यांना सर्व सायकलपटूंतर्फे श्रद्धांजली!
- डॉ. नरेंद्र पटवर्धन, पुणे

तुमचे मत मांडा...
पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अपघातांत वाढ होत आहे. याबाबत काय-काय
उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत आपले मत मांडा..

दिवसा वाहतूक करणारे डंपर नागरिकांच्या मनात धडकी भरवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com