स्वरतालांच्या संगमाने रसिक मंत्रमुग्ध
कोथरूड, ता. ९ : प्राचीन ललित कला प्रबोधिनी संस्थेच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीताची गायन वादन मैफील नुकतीच झाली. या मैफिलीची सुरुवात शौर्य पाटील या बाल कलावंताच्या शास्त्रीय संवादिनी वादनाने झाली. भूप रागातील छोटा ख्याल व त्यावरील आलापीसह आकर्षक तानांचे उत्तम सादरीकरण करून त्याने रसिकांची दाद मिळवली.
त्यानंतर शौर्य भंडारी व स्वरश्री जोशी यांनी अनुक्रमे भीमपलास व मालकंस रागांचे सादरीकरण केले. शर्वरी भंडारी हिने संवादिनीचे वादन करत गायलेल्या ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या बालगीताला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या प्रद्युम्न चव्हाण याने पियानोवर सादर केलेल्या ‘आजा सनम मधुर चांदणी में हम’ या गीताला रसिकांनी टाळ्यांसह दाद दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिवपाल पाठक, शिल्पा बगाडे, स्वराली जोशी यांनी लोकप्रिय चित्रपट गीतांचे सादरीकरण करून मैफिलीत रंगत आणली. मयूरा मुळे यांनी ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या तुकोबारायांच्या अभंगाने मैफलीत भक्ती रंगांची उधळण केली. रमा काजरेकर यांनी ‘सजना पुन्हा स्मरशील ना’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या उपशास्त्रीय संगीत प्रकारातील गीतांनी मैफलीचा गोडवा वाढवला. प्रा. स्वराली जोशी व संगीतकार जयराम जोशी यांनी संवादिनीवर, युवावादक अमित अत्रे यांनी तबल्यावर साथसंगत केली.