मुदतबाह्य औषधांचे वाटप
जितेंद्र मैड
कोथरूड, ता. २५ : महापालिकेच्या कोथरूडमधील जयभवानीनगर येथील कै. नथुराम शंकर मराठे दवाखान्यात मुदतबाह्य औषधांचे वाटप केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सुदैवाने रुग्णाने औषध घेण्याअगोदर त्यावरील मुदत पाहिल्याने अनर्थ टळला. सदोष कफ सिरपमुळे बालमृत्यू घडत असल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अवयव प्रत्यारोपण झालेल्या प्रकाश शेलार यांना या दवाखान्यातील औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) देवधर वळवी यांनी मधुमेहावरील मुदत संपलेले ‘ऍक्ट्रापिड फ्लेक्सपेन’ हे इन्शुलिन दिले. त्याचबरोबर ‘व्हिटॅमिन डी थ्री’ गोळी हवी असताना त्यांना मॅग्नेशिअम व इतर घटक असलेल्या गोळ्या दिल्या. शेलार यांनी ही बाब येथील डॉक्टरांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी औषध बदलून देतो, असे सांगत त्यावर पडदा टाकल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या दवाखान्यांतून शहरी-गरीब योजनेंतर्गत गरजूंना औषधे देण्यात येतात. ही औषधे संबंधित रुग्णाला वेळेवर देणे अपेक्षित असते. असे असताना मुदतबाह्य औषधांचे वाटप कसे केले?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
जयभवानीनगर येथे राहणाऱ्या सुगंधा खाडे म्हणाल्या, एक महिना झाला. मला औषधे मिळाली नाहीत. सारखे हेलपाटे मारावे लागतात. औषध पुरवठ्यातील दोषाला जबाबदार कोण? आम्ही गरीब रुग्णांनी कोणाकडे तक्रार करावी?
बावधन येथे नागरिक आजारी पडल्याची तक्रार होती. त्यासंदर्भात पाहणी व औषधोपचाराच्या गडबडीमध्ये आम्ही होतो. गाडीखान्यातून आलेले औषध जास्त पाहणी न करता मी रुग्णाच्या नातेवाइकाकडे दिले. त्याची मुदत संपलेली होती. चुकून माझ्याकडून मुदत संपलेले औषध देण्यात आले.
- देवधर वळवी,
औषध निर्माण अधिकारी, मराठे दवाखाना, कोथरूड
रुग्णांच्या गरजेनुसार औषधे मागवली जातात. गाडीखान्यावरुन आलेली औषधे ही दीर्घ मुदतीची असायला हवीत. मुदत संपायला आलेली औषधे पाठवली जाऊ नयेत.
- डॉ. अशोक कांबळे, वैद्यकीय अधिकारी, मराठे दवाखाना
मला जे औषध पाहिजे होते, त्याऐवजी त्यामध्ये इतर घटक असलेले औषध देण्यात येते. त्याचा दुष्परिणाम माझ्या शरीरावर होऊ शकतो. औषधांच्या बाबतीत होत असलेला हा गहाळपणा माझ्या जिवावर बेतला असता. अनेकदा मुदत संपायला आलेली औषधे देण्यात येतात. डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीतील औषध घटकांचीच, मुदत न संपलेली औषधे वेळेवर मिळावीत. यासंदर्भात यापूर्वी देखिल मी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
- प्रकाश शेलार, कोथरूड
मुदतबाह्य औषध दिल्याप्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. चौकशी नंतर तीन दिवसांत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- डॉ. संजीव वावरे,
सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
रुग्णांच्या मागण्या
१) औषधे वेळेवर मिळावीत. गरजेपेक्षा कमी औषधे मिळणे, औषध देण्यास विलंब लावणे असे प्रकार घडू नयेत.
२) गरीब व गरजूंच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवावा.
३) दीर्घ मुदतीची, डॉक्टरांनी सुचविलेले औषध घटक त्याच प्रमाणात असतील अशी औषधे रुग्णांना द्यावेत.
४) दवाखान्यात आवश्यक तेवढीच औषधे मागवली जावीत. औषधे वाया जाणे म्हणजे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आहे. आवक-जावक नोंदवही संबंधित डॉक्टरांनी वेळोवेळी तपासणे आवश्यक
आहे.
तुमचे मत मांडा...
महापालिकेच्या दवाखान्यात मुदतबाह्य औषधांचे वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरंतर हा रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. याबाबत आपले मत मांडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

