पुरेशा नागरी सुविधांचा अभाव

पुरेशा नागरी सुविधांचा अभाव

Published on

प्रभाग क्र. ११ : रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर

कोथरूड, ता. १९ : कष्टकरी कामगारांची लोकवस्ती असलेला सुतारदरा, किष्किंधानगर, केळेवाडी, हनुमाननगर, जय भवानीनगरचा समावेश असलेला हा प्रभाग पुरेशा नागरी सुविधांअभावी विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. पोटासाठी रात्रंदिन राबणाऱ्या कामगारांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून हक्काचे चांगले घर मिळेल, अशी आशा वारंवार दाखविण्यात आली. मात्र त्यांचे विकासाचे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.
मेट्रो पायथ्याला आली, पण घरापर्यंत जाण्यासाठी अरुंद रस्ते असल्याने दुचाकीसुद्धा रस्त्यावरच लावावी लागते, अशी परिस्थिती येथील रहिवाशांची आहे. जर एखादी अघटित घटना घडली तर अग्निशमन दलाची मोटार व मोठी रुग्णवाहिका येथे जाऊ शकत नाही. रोजगाराचा अभाव, गरिबी, अस्वच्छता, व्यसनाधिनता, वारंवार तुंबणाऱ्या मलवाहिन्या, अपुरा पाणीपुरवठा, यामुळे विकास आणि आरोग्य व्यवस्था खालावलेल्या या प्रभागात नगर नियोजनाबरोबरच संपूर्ण विकासासाठी विशेष काम करण्याची गरज आहे. या भागातील बहुतांश मुले महाविद्यालयीन शिक्षणापासून दूरच आहेत.

- चतु:सीमा :
उत्तर : म्हातोबा मंदिर, वेताळबाबा मंदिर, एआरएआय
पूर्व : विधी महाविद्यालयाच्या पश्‍चिमेकडील हद्दीने व पुढे शांतिशीला सोसायटीच्या पश्‍चिमेकडील हद्दीने अमर सोसायटीच्या उत्तरेकडील हद्द मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पौड रस्त्यास मिळेपर्यंत
दक्षिण : केळेवाडी रस्ता, रामबाग कॉलनी, किनारा हॉटेलकडून बळवंतपुरम साम्राज्य सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत
पश्‍चिम : पौड रस्ता कै. मिलिंद ढोले चौकात किनारा हॉटेलकडून बळवंतपुरम साम्राज्य सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत. कांचनबन सोसायटी, सहकारवृंद सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

- समाविष्ट भाग :
शिवतीर्थनगर, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, हनुमाननगर, माधवबाग, गिरिजा सोसायटी, दत्तनगर-सुतारदरा, किष्किंधानगर, एआरएआय, एमआयटी कॉलेज, मोरे श्रमिक वसाहत, भारती विद्यापीठ, एरंडवणा परिसर, बळवंतपुरम साम्राज्य.

- कुठे? काय?
- बालभारती- पौड रस्ता काम रखडले.
- एमआयटी महाविद्यालय परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. बांधकाम प्रकल्पांमुळे वाहतुकीचा त्रास नागरिकांना होतो.
- वस्ती भागात कचरा संकलन, वर्गीकरण, कचरा वाहतूक करण्यात अडचणी येतात. एआरएआय रस्ता, सुतारदरा, किष्किंधानगर मैदान येथे कचरा पडलेला असतो.
- नाल्यावर घरे, दुकाने बांधण्यात आल्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळे आले आहेत.
- पदपथ, रस्त्यावर अतिक्रमण, धूम्रपान करणाऱ्यांमुळे ज्येष्ठांना त्रास होतो.
- सुतारदरा येथे एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही.
- वस्ती भागात अनेक ठिकाणी जल व मलवाहिन्या एकत्र आल्यामुळे दूषित पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा असे प्रश्‍न निर्माण होतात.

प्रमुख समस्या :
- रखडलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प : आशिया खंडातील सर्वांत मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प येथे होणार असल्याचे १९९६ पासून चर्चेत आहे. मात्र जनता अद्यापही झोपडपट्टीतच जीवन जगत आहे.
- व्यसनाधीनता : विद्यार्थी व युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. शालेय परिसराजवळ सिगारेट, गुटखा व मादक पदार्थांची खुलेआम विक्री केली जाते.
- क्रीडांगणाचा अभाव : मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. महापालिकेच्या जय भवानीनगर येथील शाळेला मैदान नाही. त्यामुळे युवक कोथरूडबाहेर खेळण्यासाठी जातात.
- भाजी मार्केट : आरक्षण असूनही मार्केट उभारले नाही. त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत मंडई भरते. आठवडे बाजार भरतो.
- अस्वच्छ स्वच्छतागृहे : सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीची पुरेशी व्यवस्था नाही. सुतारदरा भागात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही.

- धोकादायक बांधकामे : सुतारदरा, किष्किंधानगर येथे डोंगर फोडून बांधकामे करण्यात आली आहेत. उच्चदाब वाहिनीखाली बांधलेल्या घरांमुळे मोठा अपघात होऊ शकतो.
- अरुंद रस्ते : रस्ते अरुंद असल्याने वाहने घरापर्यंत नेता येत नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरच वाहने लावतात. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- वाढती गुंडगिरी : अवैध जुगाराला आळा घालण्याची गरज आहे. परिसरात गुंडगिरीही वाढली आहे. वाहनांची तोडफोड होते.

असे आहेत मतदार
पुरुष : ३६,७९०
महिला : ३४,४०१
तृतीयपंथी : ६
एकूण मतदार : ७१,१९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com