पुणे महापालिकेला दिवाणी न्यायालयाचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेला दिवाणी न्यायालयाचा दणका
पुणे महापालिकेला दिवाणी न्यायालयाचा दणका

पुणे महापालिकेला दिवाणी न्यायालयाचा दणका

sakal_logo
By

पुणे, ता. २ : खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपये १६ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश येथील दिवाणी न्यायाधीशांनी पुणे महापालिकेला दिला आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. शिंदे यांनी हा निकाल दिला.
यश दिनेश सोनी (वय २०) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत त्यांचे वडील दिनेश फुलचंद सोनी (वय ५२, रा. औरंगाबाद) यांनी पुणे महापालिकेविरोधात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करत एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती.
यश हे २६ जून २०१६ रोजी त्यांच्या दुचाकीवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून कामगार पुतळा चौकाकडे जात होते. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवाजावर आले असता त्यांची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यामुळे घसरली. अपघातानंतर घसरत गेल्याने दुभाजकाजवळ असलेला दोन फुटांचा अर्धवट कापलेला लोखंडी रॉड यश यांच्या छातीला धडकला. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या लोखंडी रॉडमुळे यशचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा दावा सोनी यांनी केला होता.
दरम्यान, यश हा निष्काळजीपणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता दुचाकी चालवत होता. अतिवेगामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सेपरेटरला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत महापालिकेला दोषी ठरवले. सोनी यांच्या कुटुंबीयांना १६ लाख २० हजार रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च १६ टक्के व्याजासह दावा दाखल केल्याच्या तारखेपासून द्यावा, असा आदेश दिला.

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे
- लोखंडी दुभाजक योग्य स्थितीत ठेवणे, त्याचा आकार योग्य ठेवणे व देखभाल करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे
- संबंधित लोखंडी रॉड व लोखंडी सेपरेटरसंबंधी महापालिकेने जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही
- महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला
- दुभाजकाचा लोखंडी रॉड छातीला लागल्याने यश यांचा मृत्यू झाला