कर्मचारी भरतीला चार वर्षांपासून स्थगिती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी भरतीला चार वर्षांपासून स्थगिती!
कर्मचारी भरतीला चार वर्षांपासून स्थगिती!

कर्मचारी भरतीला चार वर्षांपासून स्थगिती!

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून १३ हजार ५०० हून अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी २०१९ मध्ये प्रक्रिया सुरु केली. यासाठीची रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली आणि पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविले. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर यासाठीच्या लेखी परीक्षेची तारीखही जाहीर केली. त्यानंतर राज्य सरकारने अचानकपणे या भरती प्रक्रियेला मध्येच स्थगिती दिली. या स्थगितीला आता चार वर्षांचा काळ लोटून गेला आहे. तरीही ती स्थगिती उठविलेली नाही. त्यामुळे यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आम्ही सर्वजण ही स्थगिती केव्हा उठणार, याचीच प्रतिक्षा करत आहेत.
जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांसाठीच्या २०१९ मध्ये जाहीर झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ही प्रक्रिया आजही जैसे थे स्थितीत कायम आहे. आता तरी सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

आम्ही एकीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहोत तर, दुसरीकडे या स्पर्धा परीक्षांच्या तारखाही पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यातच सरकारने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरतीच्या प्रक्रियेची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेनंतर अद्याप तरी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
- रोहीत खुडे, बेरोजगार तरुण, सातारा

प्रत्येक वेळी वेळापत्रक जाहीर करणे मग ते रद्द करणे, यातून केवळ आम्हा विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. ग्रामविकास विभाग आणि या खात्याचे मंत्री हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम करत आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांचे वय वाढत असून भरती होत नसल्याने नैराश्य येतं आहे.
- निखिल साळुंखे (नाव बदलेले आहे.)

जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती. ती अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.
- सूरज पाटील (नाव बदलले आहे)

भरती प्रक्रियेचा पूर्वनियोजित कार्यक्रम
- २६ मार्च २०१९ --- १३ हजार ५२१ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
- १४ जून २०२१ --- परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
- २८ जून २०२१ --- परीक्षेचे वेळापत्रक रद्द
- २८ ऑगस्ट २०२१ --- परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर
- २९ सप्टेंबर २०२१ --- नवे वेळापत्रकही रद्द
- १० मे २०२२ --- वेळापत्रक तिसऱ्यांदा जाहीर
- २६ ऑगस्ट २०२२ --- पुन्हा नवीन वेळापत्रक जाहीर
- १९ सप्टेंबर २०२२ --- पुन्हा वेळापत्रक रद्द
- २१ ऑक्टोबर २०२२ --- संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द

जिल्हानिहाय रिक्त जागा (२०१९ च्या जाहिरातीनुसार)
पुणे ः ५९५
नगर ः ७२९
अकोला ः २४२
अमरावती ः ४६३
औरंगाबाद ः ३६२
भंडारा ः १४२
चंद्रपूर ः ३२३
बीड ः ४५६
हिंगोली ः १५०
गोंदिया ः २५७
गडचिरोली ः ३३५
लातूर ः २८६
नंदूरबार ः ३३३
नाशिक ६८७
पालघर ः ७०८
परभणी ः २५९
रायगड ः ५१०
सातारा ः ७०८
नागपूर ः ४१८
वाशीम ः १८२
बुलडाणा ः ३३२
यवतमाळ ः ५०५
जालना ः ३२८
ठाणे ः १९६
उस्मानाबाद ः ३२०
नांदेड ः ५५७
रत्नागिरी ः ४६६
सिंधुदुर्ग ः १६२
धुळे ः २१९
वर्धा ः २६७
जळगाव ः ६०७
कोल्हापूर ५३२
सोलापूर ः ४१४
सांगली ः ४७१

सरकार व प्रशासनातील गोंधळाचा फटका बिचाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. यातून लवकरात मार्ग काढणे गरजेचे आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.