
दोन गुन्ह्यांत मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर
पुणे, ता. १८ : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने फसवणूकसह इतर कलमांनुसार दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांत दिलासा दिला आहे. दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने २१ महिन्यांनंतर जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरित तीन गुन्ह्यांमध्ये अटींची पूर्तता केल्यानंतर जामीन देण्यास सहमती दर्शविली आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला. बनावट कुलमुखत्यार दस्त आणि गहाणखत बनवून त्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून १ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर घेत फसवणूक केल्याप्रकरणी बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती. पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. शिक्रापूर येथे चार व पुण्यात एक असे पाच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.