वृत्तमालिका लोगो : देवभूमीला तडे घराप्रमाणे पुनर्वसन इमारतींनाही तडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तमालिका लोगो : देवभूमीला तडे 
घराप्रमाणे पुनर्वसन इमारतींनाही तडे!
वृत्तमालिका लोगो : देवभूमीला तडे घराप्रमाणे पुनर्वसन इमारतींनाही तडे!

वृत्तमालिका लोगो : देवभूमीला तडे घराप्रमाणे पुनर्वसन इमारतींनाही तडे!

sakal_logo
By

वृत्तमालिका लोगो : देवभूमीला तडे
योगीराज प्रभुणे

घराप्रमाणे पुनर्वसन इमारतींनाही तडे!

जोशीमठ, ता. २१ : ‘‘घरापासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर केलेल्या पुनर्वसनाने सरकारने काय साध्य केलंय? आमच्या घराप्रमाणेच तात्पुरती रहाण्याची व्यवस्था केलेल्या इमारतीलाही भेगा पडल्यात. इथे तरी आम्ही कुठे सुरक्षित आहोत?,’’ असे सवाल जोशीमठ येथील रहिवाशी असलेल्या बिरू लाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे उत्तराखंडातील चार धाम तसेच, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार अशी तीर्थक्षेत्र या राज्यात असल्याने या राज्याला देवभूमी म्हटले जाते. कडाक्याच्या थंडीमध्ये हिवाळ्यात बद्रीनाथाचे मंदिर बर्फात्छादित होते. तेथे दर्शनासाठी भाविकांना जाता येत नाही. त्यामुळे तेथील बद्रीनाथाची मुर्ती हिवाळ्यात जोशीमठातील नृहसिंह मंदिरात आणली जाते. या कारणाने जोशीमठ भाविकांचे श्रद्धास्थान ठरला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या तीर्थक्षेत्राचा काही भाग खचत आहे. घरांना तडे गेले आहेत. रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने थेट या घटनेचा फटका बसलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी लाल बोलत होते.

लाल म्हणाले, ‘‘सरकारला आपत्तीग्रस्त नागरिकांचे पुनर्वसनच करायचे होते तर, ते दुसरीकडे करणे आवश्यक आहे. घरापासून दोनशे मीटर अंतरावर आपत्तीग्रस्तांना ठेऊन काय साध्य होणार आहे? जोशीमठमध्ये उणे दोन अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झाले आहे. त्यात काही जणांचे पंचायत समितीमध्ये पुनर्वसन केले आहे. तेथे ना पुरेसे उबदार कपडे आहेत. ना हिटर आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत रात्र काढायची कशी असा प्रश्न पडतो.” कमलेश चंद्रा म्हणाले, “माझी दोन छोटी मुले आहेत. ती थंडीने कुडकुडत आहेत. अखेर, नातेवाईकांच्या घराचा आसरा शोधावा लागला.”

काय आहे प्रमुख मागणी?
सुरक्षित पुनर्वसन ही येथील नागरिकांची मुख्य मागणी असल्याचे समोर आले. घरात सुरक्षित नाही, म्हणून घर सोडायला लावले. त्यामुळे आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.