‘काट्याने’ काटा काढला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘काट्याने’ काटा काढला...
‘काट्याने’ काटा काढला...

‘काट्याने’ काटा काढला...

sakal_logo
By

‘‘हा काय प्रकार आहे कारंडे? तुमच्यामुळे माझी बस चुकली. त्यामुळे मला रिक्षाने जावं लागलं. त्यासाठी मला दीडशे रुपयांचा भुर्दंड पडला. याला जबाबदार कोण?’’ जनूभाऊंनी कारंडे यांना धारेवर धरले.
‘‘तुमच्याबाबत काहीही वाईट घडलं तरी त्याला मीच जबाबदार कसा काय असतो? गेल्या आठवड्यात तुम्हाला ठेच लागली तरी तुम्ही मलाच जबाबदार धरलं. इकडे तिकडे बघून चालल्यावर दुसरं काय होणार? त्यामुळं आधी तुमचं चालचलन सुधारा.’’ कारंडे यांनीही जशास तसे उत्तर दिले. ‘‘हे बघा कारंडे, तुम्हाला शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर वापरू नका. चालचलन म्हणजे नीट चाला, असा त्याचा अर्थ नाही. नैतिकदृष्ट्या वागणं, असा त्याचा अर्थ आहे. मी नैतिकदृष्ट्या काय वाईट वागलो, हे सांगाल का? मागंही कावेरी माहेरी गेली होती, त्यावेळी मी बाहेरून जेवण करून आलो होतो. त्यावेळी ‘जनूभाऊ, या वयात तरी बाहेरख्यालीपणा सोडून द्या’ असं म्हणाला होतात. ‘बाहेर जेवणं’ याला बाहेरख्यालीपणा म्हणतात का? शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर वापरू नका.’’ जनूभाऊंनी म्हटलं. ‘‘एखाद वेळी अर्थाचा अनर्थ होतो. त्याचं काय एवढं मनावर घेता. बरं मुद्याचं बोला. मला सोसायटीच्या ऑफिसमध्ये जायला उशीर होतोय.’’ कारंडे यांनी म्हटले. ‘‘तुम्हाला उशीर होतोय म्हणजे? एवढं काय आंतरराष्ट्रीय काम तिथं करता? पाच-सहा जण मिळून, अनुपस्थित असणाऱ्यांच्या कुचाळक्या तर करता. त्याला दहा-वीस मिनिटे उशीर झाला तर काय जगबुडी होणार आहे का?’’ जनूभाऊंचा राग उफाळून आला.
‘‘अहो अर्धा तास झाला, तुम्ही माझ्याशी वाद घालताय, पण अजून त्याचं कारणही सांगितलं नाही.’’ कारंडे यांनी हतबल होत म्हटले. ‘‘हे बघा, कारंडे, मला आज महापालिकेत अकरा वाजता जायचं होतं. त्यामुळे मी निघालो होतो. सोसायटीच्या गेटवरील घड्याळात पाहिलं तर दहा वाजले होते. त्यामुळे मी निवांत बसथांब्यावर गेलो पण तिथे गेल्यावर सहज मी एकाला किती वाजलेत, असं विचारलं तर तो ‘पावणे अकरा वाजलेत’ म्हणाला. मला उशीर होऊ नये म्हणून मी रिक्षाने गेलो.’’ जनूभाऊंनी म्हटले. ‘‘अहो, यात माझा काय दोष आहे? मी काय सूर्याला पळायला सांगितले का?’’ कारंडे यांनी त्रस्त होत म्हटले.
‘‘अहो सोसायटीच्या घड्याळातील सेल संपत आलेत. त्यामुळे ते पाऊण तास मागे पडलंय. सोसायटीचा अध्यक्ष म्हणून घड्याळ वेळेवर चालतंय की नाही, हे पाहणं, कोणाचं काम आहे? तुम्ही जगाच्या कायम मागे राहता म्हणून सभासदांनीही मागेच राहावे का? तुम्हाला साधं घड्याळ नीट चालवता येत नाही, तर तुम्ही सोसायटीचा कारभार काय चालवणार?’’ जनूभाऊंनी आवाज चढवत म्हटले. ‘‘सोसायटीचं घड्याळ मागं पडलंय पण तुमच्याही हातात घड्याळ आहे ना. त्यात का वेळ बघितली नाही?’’ कारंडे यांनी पेचात पकडले. ‘‘माझ्या घड्याळातील काटे उलटे फिरतात. त्यामुळे त्यात किती वाजलेत, यावर मी विश्वास ठेवत नाही. पण मुद्दा माझ्या हातातील घड्याळाचा नाही. सोसायटीच्या घड्याळाचा आहे. ते मागं पडलं आणि दुर्देवाने याची तुम्हाला खबरबातही नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सभासदांच्या हिताला बाधा आणणारी घटना आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही तातडीने राजीनामा द्या.’’ जनूभाऊंनी असं म्हटल्यावर कारंडे यांच्या ह्रदयाचे ठोके घड्याळाच्या ठोक्यापेक्षा जास्त मोठ्याने पडू लागले.