
‘वंदे भारत’ला सगळेच ग्रीन सिग्नल
लोगो ः थेट इंजिनमधून
पुणे, ता. १० ः वंदे भारत एक्सप्रेसची मुंबईहून सुटण्याची वेळ ही दुपारी ३ वाजून १० मिनिटांची होती. मात्र काही कारणांमुळे ही रेल्वे दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निघाली. पहिल्याच दिवशी उशीर झाला. वंदे भारतच्या प्रवासाचा पहिला दिवस असल्याने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून गाडीचे नियोजन होत होते. गाडीला मिनिटदेखील उशीर होऊ नये म्हणून रेल्वेला कुठेच लाल किंवा पिवळा सिग्नल दिला नाही. हिरवा सिग्नल मिळत राहिला अन् वंदे भारत एक्सप्रेस सुसाट धावत होती.
चालकासोबत निरीक्षकांचीही नजर
वंदे भारत एक्सप्रेसला कुठेच अडचण येऊ नये म्हणून लोकोपायलटसोबत त्या विभागाचे मुख्य लोको निरीक्षकही उपस्थित होते. पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक ज्वेल मेकांझी हे स्वतः उपस्थित राहून इंजिन (कॅब) मध्ये नजर ठेवून होते. अन्य रेल्वेना इतर मार्गावर घेण्यात येत होते. त्यांचे सहकारीदेखील सतत यंत्रणेद्वारे गाडीला ग्रीन सिग्नल यावा म्हणून पुढच्या विभागाला निरोप देत होते.
यांनी केले सारथ्य
मुंबई विभागाचे के पॉल आणि विपूल कुमार या दोन चालकांनी गाडीचे सारथ्य केले. या वेळी पुणे व सोलापूर रेल्वे विभागाचेदेखील निरीक्षक उपस्थित होते.
जेवणाचा बेत आवडला
ज्येष्ठ नागरिकांना सोसेल असे उत्कृष्ट जेवण आहे. शिवाय स्वच्छता खूप छान होती. गुडघ्यांना किंवा पाठीच्या कण्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अतिशय उत्कृष्ट बांधणी आहे.
- लीना भागवत, चंद्रकांत भागवत, जोडपे
सुखद अनुभव
या गाडीने प्रवास करणे म्हणजे सुखद अनुभव होता. गाडी खूप छान आहे आणि सर्वांना वेळेत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून याचा चांगला उपयोग होणार आहे.
- साधना जांभळे, गृहिणी