
उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी
अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा
बंगळूर, ता. १३ : देशातील खासगी उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या अमृतकाळात देशात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढले असून या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. या संधीचा फायदा उद्योगांना घेता येईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भारतीय हवाईदलातर्फे कर्नाटकातील येलंका येथे आयोजित १४ व्या ‘एरो इंडिया’ या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकची मुख्य सचिव वंदिता शर्मा, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी, नौदल प्रमुख अडमिरल हरी कुमार आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘ज्या देशात मागणी, अनुभव आणि क्षमता अधिक असते, त्या देशात उद्योग वाढतो. अशी स्थिती आता भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात सहभाग वाढवावा. स्वदेशी व नावीन्यपुर्ण तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक उत्पादने तयार करत भारताने जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. तेजस सारखे स्वदेशी विमान व आयएनएस विक्रांत हे त्याचेच उदाहरण आहे. केवळ निर्मितीच नाही तर आपल्या उत्पादनांची क्षमता पाहता, मित्र देशांचा या उत्पादनांच्या प्रति विश्वास वाढत आहे. परिणामी परदेशातील उद्योग आणि भारतातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार होत आहेत.’’
निर्यातीत ही पुढे
भारताद्वारे ७५ देशांना संरक्षण साहित्य निर्यात करण्यात येत आहे. मागील ८ ते ९ वर्षात निर्यात क्षेत्रात ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या भारताची संरक्षण उत्पादनांची निर्यात १.५ बिलियन डॉलर असून २०२५ पर्यंत ते ५ बिलियन डॉलर्स करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सामर्थ्य दर्शविणारा कार्यक्रम
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगळूरचे आकाश हे नव्या भारताच्या सामर्थ्याचे साक्षीदार ठरत आहे. या माध्यमातून लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, उपकरणे आणि नवीन युगातील एव्हीओनिक्सच्या निर्मितीसाठी उदयोन्मुख केंद्र म्हणून भारताची प्रतिमा समोर येईल. एरो इंडिया हा फक्त विमानांची कवायती सादर करणारा कार्यक्रम राहिला नसून भारताचा आत्मविश्वास आणि क्षमतांचे प्रतिबिंब आहे. २१ व्या शतकातील हा नवा भारत येणारी कोणतीही संधी सोडणार नाही, असे मोदींनी नमूद केले.
एरो इंडियाच्या पहिला दिवशी....
- संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद
- हवाई दलाच्या ताफ्यातील विमानांची प्रात्यक्षिके
- विविध उद्योगांचे प्रदर्शन
पंतप्रधान म्हणाले...
- मेक इन इंडियाच्या माध्यमातून ‘मेक फॉर वर्ल्ड’ असे ध्येय
- देशातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत आहे
- संरक्षण मंत्र्यांच्या कॉनक्लेव्ह हे एरो इंडियाचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढविण्यासाठी गरजेचे
- देशात मित्र देशांची गुंतवणूक वाढविणे आणि भारतीय नाविन्यतेच्या इकोसिस्टमला तयार करण्याकरिता नियमांना सोपे केले
- एफडीआयला मंजुरी
- उद्योगांसोबत लायसंसिंग कराराची प्रक्रिया सोपी केली