काँग्रेसने ७० वर्षात व्यापार्यांसाठी काय केले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसने ७० वर्षात व्यापार्यांसाठी काय केले?
काँग्रेसने ७० वर्षात व्यापार्यांसाठी काय केले?

काँग्रेसने ७० वर्षात व्यापार्यांसाठी काय केले?

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : दहा वर्षांपूर्वी भारताची स्थिती पाहून आपल्याला हिणवले जात होते; परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हापासून  परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसने ७० वर्षांत व्यापाऱ्यांसाठी काय केले, या सगळ्याचा विचार करून रासने यांना विजयी करावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ दादावाडी येथील सभागृहात भाजप जैन प्रकोष्ठ आणि भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी मेळावा झाला. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषद नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार माधुरी मिसाळ, उमेदवार रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्याचे म्हणत हिणवले जात होते. काँग्रेसने एलबीटी करप्रणाली आणली. हा कर जाचक होता, तो २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बंद करून व्हॅट कर प्रणाली आणली.  त्यात व्यापाऱ्यांना अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला. आता केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली आणून त्यातही अजून सुटसुटीतपणा आणला. व्यापारांच्या समस्या भाजपच सोडू शकतो, या विचाराने मतदान करा.’’
प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांना व्यापारी जे सांगतो, त्यावर ग्राहक विश्वास ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मतांनी विजयी करा.’’
मेळाव्याला राजेश सांकला, महेंद्र पितळीया, विजय भंडारी, महेंद्र व्यास, महेंद्र शिंदे, प्रकाश बाफना, राजेश शहा, उत्तम भाटिया व अनेक व्यापारी उपस्थित होते.

जनतेला वाऱ्यावर सोडले
कोरोना काळात संकट असताना त्यांनी जनतेला मदत केली नाही. लसीकरणासाठी पैसे नाहीत, असे सांगितले. मात्र दुसरीकडे दारूवरील करात सूट देऊन महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. रासने यांच्या प्रचारार्थ महिला बचत गट मेळावा झाला. या वेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. मोदीजींना साथ द्यायची असेल, तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रासने यांना मतदान द्या.’’ अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. कोरोनाच्या काळात संकट असताना त्यांनी जनतेला मदत केली नाही. लसीकरणासाठी पैसे नाहीत, असे सांगितले.