
एका फेरीत २२ टन कचरा होणार वाहतूक ट्रक महापालिकेच्या ताफ्यात; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे, ता. २७ : पुणे शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढत असताना त्याचा ताण कचरा वाहतुकीवर देखील पडत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ही वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिकेने २० ते २२ टन कचऱ्याची वाहतूक करणारे तीन ट्रक महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. सारसबाग येथील सरस ग्राउंड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता.२७) या ट्रकचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, कीथ कंपनीच्या अध्यक्षा लिंडसे फॉस्टर ड्रॅग्रो, संचालक वरून गजरा, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यावेळी उपस्थित होत्या. केंद्र शासनाने १५ व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर सुमारे अडीच कोटी रुपयांचे हे तीन ट्रक खरेदी केले आहेत. या ट्रकमध्ये वॉकिंग फ्लोरची यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. ही यंत्रणा चालविण्यास सोपी असून महापालिका कर्मचाऱ्यांनाच याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महापालिकेकडून सध्या शहरात कचरा वाहतुकीसाठी हायवा ट्रक वापरण्यात येतात. त्यांची क्षमता पाच ते १० टन आहे. या ट्रकमध्ये कचरा भरल्यानंतर तो आतमध्ये दाबण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे कचरा भरण्यासाठी व उतरविण्यासाठी अर्धा ते पाऊण तास जातो. तसेच कचरा मोठया प्रमाणात बाजूला पडतो. या नवीन ट्रकमध्ये वॉकिंग फ्लोर असून कचरा १० मिनिटात भरता येतो. आतमध्ये पडलेला कचरा स्वयंचलित यंत्रणेत दाबला जातो. परिणामी, जुन्या हायवाच्या तीन ट्रकमध्ये बसणारा कचरा कीथच्या एकाच ट्रकमध्ये बसतो. परिणामी, कचरा वाहतुकीचा खर्चही कमी होणार आहे. शिवाय, गाडी रिकामी करताना कचऱ्याचे सांडण्याचे प्रमाणही कमी होते, अशी माहिती अशा राऊत यांनी दिली