
नॅक नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश बंदी
पुणे, ता. ७ : पदवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश नवीन शैक्षणिक धोरणानुसार घ्यायचे का नाही, याबद्दल संभ्रम असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नॅक नसलेल्या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश बंदी घातली आहे.त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक प्रवेशात यामुळे अधिकच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रवेश नवीन शैक्षणिक धोरणानुसार घेण्याचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केली आहे. मात्र अजूनही अभ्यासक्रम आराखडा आणि विषयांची निश्चिती न झाल्यामुळे प्रथम वर्षाच्या प्रवेशासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचे (नॅक) मूल्यांकन किंवा एनबीए मानांकन अजूनही घेतले नसेल, अशा महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात उच्च शिक्षण संचालनालयाने घेतलेल्या निर्णयाचा दाखला दिला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘अद्याप ज्या महाविद्यालयांनी मूल्यांकन किंवा मानांकनासाठी अर्ज सादर केलेले नाहीत, अशा महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश विद्यापीठाच्या परवानगीशिवाय करू नयेत. विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालय किंवा संस्थेची असेल.’’
बारावीच्या निकालानंतर आता प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असतानाच या नव्या परिपत्रकामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. नुकतेच सुरू झालेले आणि ज्यांचे अजूनही मूल्यांकन झाले नाही, अशा महाविद्यालयांना याचा मोठा फटाका बसणार आहे. मूल्यांकन प्रक्रियेतील अर्जाचा पहिला टप्पा (आयआयक्यूए) तरी महाविद्यालयांनी भरणे अपेक्षित आहे.
नव्या धोरणाची पार्श्वभूमी
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महाविद्यालयांना मूल्यांकन प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्या संबंधातील परिपत्रके वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र अजूनही काही महाविद्यालये मूल्यांकन प्रक्रियेबाहेर असल्याने विद्यापीठाने हे पाऊल उचलल्याचे दिसते.
परिमाण काय
- प्रथम वर्षाचे प्रवेश लांबणार
- मूल्यांकन नसलेली महाविद्यालये प्रवेशाला मुकणार
- याचा थेट फटका स्थानिक विद्यार्थ्यांना बसणार
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत संभ्रम वाढणार
- व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला फटका