दर्जेदार अन् तितकंच मनोरंजक बालनाट्य 
- नवे नाटक : आज्जी बाई जोरात

दर्जेदार अन् तितकंच मनोरंजक बालनाट्य - नवे नाटक : आज्जी बाई जोरात

आजची लहान मुले ही रंगभूमीची उद्याची प्रेक्षक आहेत. त्यांना नाटक या माध्यमाविषयी ओढ वाटावी, त्यांनी नाटक पाहायला यावं, असं तळमळीने नेहमीच म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांना नाटकाची गोडी लावायची असेल, तर त्यांना आपलीशी वाटतील आणि त्यांच्या भावविश्वाशी निगडित असतील, अशी दर्जेदार बालनाट्य निर्माण व्हायला हवीत. हीच गरज पूर्ण करणारं, नव्या पिढीच्या खऱ्याखुऱ्या प्रॉब्लेम्सविषयी बोलणारं आणि नव्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून मुलांचं मनोरंजन करणारं बालनाट्य रंगभूमीवर आलं आहे, ते म्हणजे आज्जी बाई जोरात!
- महिमा ठोंबरे

अक्षर या शाळेत शिकणाऱ्या मुलाला आजकालच्या बहुतांश मुलांप्रमाणेच मोबाईलचा व्यसन लागलं आहे. मोबाईलमधील गेम सतत खेळण्याच्या व्यसनापायी त्याला शिक्षकांनी शिक्षा देखील केली आहे. त्यातच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्यामुळे आणि आसपास इंग्रजीचा पगडा असल्यामुळे त्याची मातृभाषा अर्थात मराठी भाषा पार बिघडलेली आहे. अक्षरचं हे मोबाईलचं व्यसन कसं सोडवायचं आणि मराठी भाषेचं महत्त्व त्याला कसं पटवून द्यायचं, या चिंतेत त्याची आई आहे. अशावेळी त्यांना मार्ग दाखवायला येते ती ग्रॅनी अर्थात आजी. मोबाईल गेमचीच मदत घेत, हसतखेळत आणि भन्नाट क्लृप्त्या वापरून ती अक्षरचं मोबाईलचं व्यसन तर सोडवतेच, पण मराठी भाषेचे सौंदर्य उलगडत त्याला मराठीची गोडीही लावते. ही सगळी गोष्ट एका फँटसीच्या अंगाने जाते, ज्यात या आजीला त्या काल्पनिक मोबाईल गेममधले गमतीशीर पात्र मदत करतात.
मोबाईलच्या आहारी गेलेली नवीन पिढी आणि इंग्रजी माध्यमामुळे मराठीविषयी मुलांमध्ये असणारी अनास्था, हे दोन्ही विषय या कथेत केंद्रस्थानी आहेत. एकाच वेळी या दोन्ही विषयांची हाताळणी लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी अतिशय खुबीनं केली आहे. संहितेचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे ती कुठलेही उपदेशाचे डोस पाजत नाही. मुलांशी गप्पा मारत आणि त्यांच्या कलाने ही कथा पुढे सरकते. त्यासाठी मोबाईल गेमच्या फँटसीचा आधार घेऊन निर्माण केलेली गंमतशीर पात्र मुलांना खळखळून हसवतात, योग्य जागी पेरलेली गाणी मुलांना ताल धरायला भाग पाडतात आणि ॲनिमेशनसारख्या तंत्राचा वापर केल्यामुळे मुलं खिळून राहतात. मुलांच्या मोबाईल अ‍ॅडिक्शनविषयी बोलताना पालकही कळत-नकळत कसे मोबाईलमध्येच गुंग असतात, यावरही नाटकात बोट ठेवले आहे. त्यामुळे मुलांना गोष्ट अधिकच ‘पटत’ जाते. उत्तम गाणी आणि नृत्यरचना, जादूचा वापर, एका पात्राला दिलेली १० फूट उंची अशा वेगवेगळ्या युक्त्या योजून क्षितिज पटवर्धन यांनी गंभीर विषय मनोरंजन होईल, याची काळजी घेतली आहे.
अभिनय बेर्डे याने या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. मात्र त्याने साकारलेल्या अक्षरच्या भूमिकेत कुठेही नवखेपणा जाणवत नाही, उलट तो ‘लंबी रेस का घोडा’ असेल, असं वाटणारं सुंदर काम त्याने केलं आहे. वयाने बरंच लहान असलेलं पात्र साकारताना त्यात आवश्यक असलेला निरागसपणा त्याने अगदी अचूक पकडला आहे. आजीच्या भूमिकेत असलेल्या निर्मिती सावंत यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्यांचा अचाट उत्साह पाहून थक्क व्हायला होतं. अक्षरला प्रेमानं समजावणारी आजी, मध्येच पात्रातून बाहेर येऊन प्रेक्षकांमधल्या मुलांशी बोलणारी आजी आणि प्रशिक्षित नृत्य कलाकारांसह तितक्यात उत्साहाने नृत्य करणारी आजी, हे त्यांचं रूप प्रत्येकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. पुष्कर श्रोत्री यांचा वेगवेगळी भाषा बोलणारा ‘अ’ पुरेपूर हशा वसूल करतो. मुग्धा गोडबोले यांनी साकारलेली आई प्रत्येक मुलाला आपल्या आईसारखीच वाटते. जयवंत वाडकर यांनी साकारलेला ‘गेमाड’ व्हिलनही हटके आहे.
प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना नाटकाला हवी असलेली भव्यता प्राप्त करून देते. सौरभ भालेराव यांचं संगीत लहान मुलांसह मोठ्यांनाही ताल धरायला लावतं. सुभाष नकाशे यांच्या नृत्यरचना सोप्या पण अतिशय कल्पक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजातील नाटकाची घोषणा सुखद धक्का देऊन जाते. हा भव्य घाट घालण्यासाठी नाटकामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या जिगीषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांचेही अभिनंदन करायला हवे. नाटकादरम्यान प्रचंड उत्साहाने आरडाओरडा करत सहभागी होणारी आणि नाटकानंतर सगळ्या पात्रांना येऊन बिलगणारी पोरं, हीच त्याच्या यशाची पावती आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी आणि
मुलांनी एकत्र नक्की हा अनुभव घ्यायलाच हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com