अखेरपर्यंत उभा होता कार्यकर्ता !

अखेरपर्यंत उभा होता कार्यकर्ता !

पुणे, ता. ४ : आज नक्की काय होणार? ताई येणार की वहिनी येणार?, या चिंतेत मतमोजणी केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी, जसजशा फेऱ्या वाढत गेल्या, तशी कार्यकर्त्यांमध्ये वाढलेली कुजबूज आणि जसजसे ऊन उतरतीला लागले, तसे निकालाच्या आकडेवारीने काहींचे चेहरे उजळले आणि काहींचा मूड ऑफ’ झाला. एरवी नेत्याच्या प्रत्येक प्रसंगात पाठीशी उभा असणारा हाच कार्यकर्ता मंगळवारीही तितकाच खंबीरपणे उभा होता, कडाक्याचे ऊन, जोरदार वारा अन् मुसळधार पावसाची तमा न बाळगता, जय-पराजय मनात ठेवून कार्यकर्ता आपल्या उमेदवार व पक्षावरील निष्ठेपोटी अखेरपर्यंत खंबीरपणे उभा होता, हे चित्र होते, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी ठिकाणचे !

गावखेड्यातील पारापासून ते शहरांमधील छोट्या-मोठ्या गल्लीतील बाकड्यावर गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची चर्चा होती. निवडणूक झाली अन् सगळ्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते, अखेर तो दिवस उगवला. कोरेगाव पार्क येथे मंगळवारी पुणे व बारामती मतदारसंघातील मतमोजणी होती. त्यासाठी इंदापूर, बारामती, भोर, खडकवासला अशा सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांची पावले, कोरेगाव पार्कच्या दिशेने वळली. अनेक गाड्या भरून कार्यकर्ते पुण्याला आले होते. पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळ येथील मतमोजणी केंद्राभोवती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी बॅरिकेड्स टाकून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. रस्त्यावरील स्टॉल हटवून नागरिकांना तेथे थांबण्यास मज्जाव करण्यात येत होता. केंद्रापासून एक ते दोन किलोमीटर दूर वाहने लावून कार्यकर्ते पायी चालत केंद्राच्या परिसरात पोचले. काही मोजक्याच कार्यकर्त्यांकडे पास असल्याने त्यांना मतमोजणी केंद्राकडे जाता आले, उर्वरित कार्यकर्ते मात्र जागेवरच थांबून होते.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
काहीही केले तरी ताईच येणार, घासून होईल, पण वहिनीच येतील, अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या होत्या. पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविण्यावर भर दिला जात होता. पहिली फेरी सकाळी सव्वानऊ वाजता सुरू झाली, त्यानंतर एकापाठोपाठ फेऱ्या पुढे सरकू लागल्या, तशा कार्यकर्त्यांच्या बोलण्यात एकमेकांना धीर देणारे शब्द येऊ लागले. तर काहींनी ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’, ‘येऊन येऊन येणार कोण’, ‘अजित दादा, अजित दादा’ अशा घोषणा हवेत घुमू लागल्या. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार होऊ लागले, तर काहींनी पेढे, फेटे, गुलाल आणण्याच्या सूचना करण्यास सुरुवात केली. मात्र कोणाचाही अनादर होणार नाही, याची काळजी कार्यकर्ते घेत होते. दरम्यान, निकाल आपल्या बाजूला झुकल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. आपापसांत लागलेल्या पैजा वसूल करण्याची तयारी देखील सुरू झाली. आता मात्र वेध लागले होते, ते आपले उमेदवार मतदान केंद्राकडे नेमके केव्हा येणार याकडे.


आनंदाला वरुणराजाची साद
आत्तापर्यंत उन्हात थांबलेल्या कार्यकर्त्यांची कडाक्याच्या उन्हापासून सुटका झाली, हवेत ढग जमू लागले, एकीकडे आपल्या उमेदवाराचे मताधिक्य वाढत असताना आनंदित झालेल्या हवेची हलकीशी झुळूक आणि त्यापाठोपाठ आलेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा दिला, तसाच बराच गोंधळही उडवून दिला. मात्र ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता कार्यकर्ते उमेदवारासमवेत अखेरपर्यंत ठामपणे उभे राहिले. उत्तरोत्तर पावसाचा जोर वाढू लागला, त्यामुळे आता नेत्यांना भेटण्यासाठी वेळ न घालवता हळूहळू कार्यकर्त्यांची पावले आपल्या घराकडे वळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com