नव्या कायद्यानुसार शहरात दोन गुन्हे दाखल

नव्या कायद्यानुसार शहरात दोन गुन्हे दाखल

पुणे, ता. २ : देशात नव्याने लागू झालेल्या फौजदारी कायद्यानुसार शहरात सोमवारी (ता. १) दोन गुन्हे दाखल झाले आहेत. वारजे पोलिस ठाण्यात पहिला तर हडपसर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे आणि हडपसर पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत. सिद्धार्थ पाटोळे, सिद्धेश भोसले, बाळा (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्यासह त्यांच्या साथीदारावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय सुरेश तुपे (वय ३२, रा. साई कॉर्नर, शिवगंगा सोसायटी, कॅनल रोड, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (ता. १) रात्री एकच्या सुमारास वारजे येथील कालवा रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ असलेल्या पान टपरी शेजारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुपे हे मेट्रोसाठी काम करणाऱ्या स्टर्लिंग अँड विल्सन या कंपनीत नोकरी करतात. तुपे आणि त्यांचे मित्र दत्ता साबळे असे या पानटपरीजवळ गप्पा मारत उभे होते. त्यावेळी त्यांच्यापासून काही अंतरावर आरोपी सिद्धार्थ पाटोळे, सिद्धेश भोसले आणि बाळा नावाचे तरुण त्यांच्या साथीदारांसह उभे होते.
आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच, एकाच भागात राहणारे आहेत. आरोपी दारू प्यायलेले होते. त्यांचे आणि तुपे यांच्या मित्राशी वाद झाले आहेत. त्यावरून झालेल्या वादात तुपे हे मध्यस्थी करण्यास गेलेले असताना त्यांना आरोपींनी मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार धनंजय देशमुख करत आहेत.
दुसरा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याने जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. ही घटना हडपसरच्या साडेसतरानळी येथील साईसंकल्प सोसायटीसमोर सोमवारी सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शामादेवी रामाशिष शर्मा (वय ७३) यांनी फिर्याद दिली आहे. शर्मा या साईसंकल्प सोसायटीसमोरून पतीसह दूध आणण्यासाठी पायी चालत जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून दोन तरुण त्यांच्याजवळ आले. काही कळण्याच्या आतच पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यामधील ६० हजार रुपयांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com