विद्यापीठ वसतिगृहात प्रवेशासाठी नियमावली ः चंद्रकांत पाटील

विद्यापीठ वसतिगृहात प्रवेशासाठी नियमावली ः चंद्रकांत पाटील

Published on

पुणे, ता. ३ : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात ओळखपत्राशिवाय विद्यार्थी तसेच अन्य कुणालाही प्रवेश करता येत नाही. ही प्रवेश नियमावली कटाक्षाने पाळण्यासाठीची सुव्यवस्थित कार्यप्रणाली (एसओपी) कार्यान्वित केली आहे’’, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे अमली पदार्थ सापडल्याच्या घटनेबाबत सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले,‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या या घटनेची गांर्भीयाने नोंद घेण्यात आली असून या घटनेबाबतचा एफआयआर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे. संबंधित घटनेवेळी जप्त केलेले साहित्य पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पोलिस यंत्रणेमार्फत याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे. वसतिगृहाची सुरक्षा वाढविण्याबाबत सुरक्षा विभागाला आदेश दिले आहेत. तसेच संबंधित विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या वसतिगृह नियमांचे उल्लंघन केले असल्याने याबाबत माफीनामा दिला आहे. या विद्यार्थ्याचा वसतिगृह प्रवेश रद्द करण्यात आला असून त्याच्या पालकांना ही याबाबत समज दिली आहे. तसेच या घटनेबाबतचा योग्य तो तपास करण्यासाठी कुलगुरूंनी तज्ञांची चार सदस्यीय समिती स्थापन केली असून समितीचे कामकाज सुरु आहे’’.
विद्यापीठ आवारात अशी घटना आधी कधीही घडलेली नाही तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. यासाठी विद्यापीठ प्रशासन काळजी घेत आहे. तसेच आवश्यक ती सर्व कार्यवाही विद्यापीठामार्फत करण्यात येत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.