रसिकांसाठीच तयार केला ‘नवरा माझा नवसाचा २’

रसिकांसाठीच तयार केला ‘नवरा माझा नवसाचा २’
Published on

पुणे, ता. २२ ः ‘‘ज्या वेळी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच वेळी वेगळ्या प्रकारे नवस फेडला असता, तर अधिक गंमत आली असती, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हाच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची कथा सुचली होती. म्हणून मग या सुचलेल्या विचारावर हा नवा चित्रपट आकारास आला. हा चित्रपट मी फक्त रसिकांसाठी तयार केला आहे,’’ अशी भावना निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
पिळगावकर यांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय असलेला हा चित्रपट गेल्या शुक्रवारी (ता. २०) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला रसिकांचा ‘हाउसफुल्ल’ प्रतिसाद मिळत आहे.
पिळगावकर म्हणाले, ‘‘आम्ही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली, त्या वेळी स्वप्नील जोशी यांनी सहज म्हणून समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या वेळी रसिकांचे या चित्रपटाशी असलेले घट्ट भावनिक नाते आमच्या लक्षात आले. चित्रीकरण होऊन चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत ही उत्सुकता सातत्याने वाढतच गेली. प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक शो ‘हाउसफुल्ल’ झाले. रसिकांच्या या प्रतिसादाने आम्ही खरोखरच भारावून गेलो आहोत. विशेषतः तरुणाई आवर्जून चित्रपट पाहत आहे. लोक स्वतःहून इतरांना हा चित्रपट पाहण्यासाठी सांगत आहेत. हेच या चित्रपटाचे यश आहे.’’
चित्रपटाच्या प्रक्रियेबाबत सांगताना ते म्हणाले, ‘‘दुसऱ्या चित्रपटाचा विचार करताना मला आधी कथेचा उत्कर्षबिंदू (क्लायमॅक्स) सापडला होता. कथेतील मध्यवर्ती पात्रे तीच कायम राहणार, हेदेखील नक्की होते. मग पुढे कथा गुंफत गेलो. त्यात एक सुंदर प्रेमकथा आहे, जे या चित्रपटातील नावीन्य आहे.’’
सुश्रिया चित्र यानिर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा–पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. यात सचिन पिळगावकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, अभिनेते स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव आदी कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com