फुफ्फुसाच्या कर्करोगाची नवीन उपचार पद्धतीतून मुक्ती
पुणे, ता. ३१ : मुखाच्या कर्करोगापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग (कॅन्सर) होतो तो म्हणजे फुफ्फुस (लंग) या अवयवाचा. धूम्रपानासह पर्यावरणीय प्रदूषण व बदललेली जीवनशैली हे घटक याला कारणीभूत ठरत आहेत. अलीकडील काळात त्यामध्ये नवीन उपचारपद्धती विकसित झाली आहे. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची जीवनमान वाढण्याची व गुणवत्ता सुधारणा देखील झाली आहे. परंतु, यासाठी लवकर लक्षणे ओळखून उपचार घेणे गरजेचे आहे.
दरवर्षी १ ऑगस्ट हा ‘जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जनजागृती करणे आणि धूम्रपानमुक्त जीवनशैलीबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले जाते.
क्षयरोग व याची लक्षणे सारखी
दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, पुढील टप्प्यात दम लागतो, आवाजात बदल होणे, छाती दुखणे, भूक कमी होणे, बेडके पडणे व खोकल्यातून रक्त येणे अशी लक्षणे असल्यास क्षयरोगाची तपासणी करावी व ती नकारात्मक असल्यास फुफ्फुस कर्करोगाची तपासणी करावी.
प्रगत उपचार उपलब्ध
यामध्ये टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी तर शस्त्रक्रियेतही प्रगत तंत्र जसे दुर्बिणीने फुफ्फुसातील कर्करोगाच्या गाठी काढणे, एसबीएआरटी टार्गेटेड रेडिएशन यामुळे रुग्णांच्या उपचारात सुधारणा झाली आहे.
फुफ्फुस कर्करोगाची कारणे?
१) मुख्य कारणांमध्ये सिगारेट, बिडी, तंबाखू यांचे सेवन आणि सभोवताली असलेले प्रदूषण
२) विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या पेशींमध्ये हानिकारक बदल होऊन कर्करोग निर्माण होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते
३) शहरी भागांतील वायू प्रदूषण, औद्योगिक धूर आणि ग्रामीणभागात घरगुती लाकूड जाळण्याच्या धुरानेही धोका वाढतो.
दरवर्षी नवीन कर्करोग रुग्ण
२ लाख १ हजार
- उत्तर प्रदेश
१ लाख १६ हजार
- महाराष्ट्र
१ लाख ८ हजार
- पश्चिम बंगाल
१ लाख ३ हजार
- बिहार
८८ हजार
- तमिळनाडू
८५ हजार
- कर्नाटक
७० हजार
- आंध्रप्रदेश
५७ हजार
- केरळ
(भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद २०२० च्या अहवालानुसार. यात २०२५ मध्ये १५ टक्के अतिरिक्त वाढ)
गेल्या २० ते २५ वर्षांच्या तुलनेत जनजागृतीमुळे धूम्रपानाचे प्रमाण कमी होत आहे; परंतु वाढलेल्या निदान सुविधेमुळे फुफ्फुस कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. ७५ टक्के रुग्ण हे तिसऱ्या टप्प्यात हा कर्करोग पोचल्यावर येतात. त्या ७५ टक्क्यांपैकी २५ टक्के रुग्णांवर
शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपीने कर्करोग मुळापासून बरा होतो तर उरलेल्यापैकी काहींना टार्गेटेड थेरपी (गोळ्यांच्या माध्यमातून (३ ते ४ वर्षे) तर काहींना केमोथेरपी, इम्युनोथेरपी द्यावी लागते.
- डॉ. लखन कश्यप,
कर्करोगतज्ज्ञ, मणिपाल रूग्णालय, बाणेर