ताम्हिणी परिसरामध्ये ५७५ मिमी पाऊस
पुणे, ता. २० ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. ताम्हिणी परिसरात दोन दिवसांपासून अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. ताम्हिणी घाटात बुधवारी सकाळपर्यंत (त्याआधी २४ तासांत) तब्बल ५७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भिरा परिसरातही ५६८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर धुवाधार पाऊस पडत आहे. पुण्यातील घाट माथ्यावर मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला होता. घाट परिसरात बुधवारी पावसाचा जोर कायम होता. ताम्हिणी घाट परिसरात जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठपर्यंत (गेल्या २४ तासांत) लोणावळा- टाटा (४१८ मिलिमीटर), शिरगाव (४३० मिलिमीटर), वळवण (२७१ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली.
हलक्या पावसाची शक्यता
पुण्यात गुरुवारी (ता. २१) आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होईल. शुक्रवारी ( ता. २२) पुणे आणि आसपासच्या परिसरात अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.