शिवचरित्र सांगणे हे धैर्यशील लोकांचे काम
पुणे, ता. १९ ः ‘‘इतिहासात पुरावे हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चरित्र समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या पत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शिवचरित्र सांगणे हे धैर्यशील लोकांचे काम आहे; घाबरणाऱ्यांचे नाही,’’ असे स्पष्ट मत इतिहास संशोधक डॉ. केदार फाळके यांनी व्यक्त केले.
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यरत असलेल्या मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक डॉ. केदार फाळके यांना, तर समाजकार्य पुरस्कार वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) माजी पोलिस महासंचालक व मॅटचे न्यायाधीश अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर ‘वर्तमानकाळासाठी शिवचरित्र’ या विषयावर डॉ. फाळके यांचे व्याख्यान झाले. मृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक व कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे, उपाध्यक्षा मृणालिनी शिवाजीराव सावंत आणि कोषाध्यक्ष अमिताभ शिवाजीराव सावंत या वेळी उपस्थित होते.
डॉ. फाळके म्हणाले, ‘‘इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी शिवचरित्रातील न उमगलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. मेहेंदळे सर माझे गुरुवर्य असून, मित्रही होते. त्यांनी इतिहासातील कायम सत्य गोष्टी सांगाव्यात याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. इतिहासाचे संदर्भ ठोस असावेत याला ते नेहमीच प्राधान्य देत. त्यांनी दिलेल्या दृष्टिकोनामुळे मीही सत्य कथन करण्याचे धैर्य राखतो.’’
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले, किल्ल्यांची अवस्था सुधारली, सैन्य व्यवस्था आणली, बदल स्वीकारण्याची मानसिकता व प्रयोगशीलता ठेवली. ते त्यांच्या धैर्यापासून कधीच विचलित झाले नाहीत. जे आहे ते सत्य कथन केले पाहिजे; सत्य सांगण्याची मला भीती वाटत नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, ‘‘वाचनाने माणूस समृद्ध होतो. ज्ञानवृद्धीसाठी वाचनाचा पाया भक्कम असावा लागतो. शिवाजीराव सावंत यांनी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जाऊन ‘मृत्युंजय’ लिहिले. त्यांनी ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या आणि चरित्रांपुरतेच लेखन मर्यादित ठेवले नाही, तर दूरदर्शनसारखे माध्यमही हाताळले. त्यांचे लेखन काळाच्या पुढे होते. त्याची नोंद घेण्याची आज गरज आहे.’’
या वेळी डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविक, तर अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. अमिताभ सावंत यांनी आभार मानले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.