महापालिकेमुळे पुन्हा मनस्ताप
पुणे/सिंहगड रस्ता, ता. १९ : सिंहगड रस्त्यावर विश्रांती चौकात पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबी भर रस्त्यात बंद पडला. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी सुरू झाली. शाळेला जाणारे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे नागरिक या कोंडीत पाऊण तासापेक्षा जास्त काळ अडकून पडले होते. वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप करून या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली. पण महापालिकेच्या या कामामुळे सकाळी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पाणीपुरवठा विभागाने हिंगण्यातील विश्रांती चौकात जलवाहिनी टाकण्याचे काम रात्री सुरू केले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हे काम जेसीबीच्या साह्याने केले जात असताना त्याची बॅटरी संपली. भर रस्त्यात जेसीबी बंद पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या कामाबाबत वाहतूक पोलिसांना कल्पना नसल्याने तेथे पोलिसही उपस्थित नव्हते.
या वाहतूक कोंडीत कामाला जाणारे नागरिक, मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणारे पालक अडकून पडले. उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली जवळपास एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. समाजमाध्यमावर या वाहतूक कोंडीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्वरित विश्रांती चौकात येऊन वाहतूक नियोजन सुरू केले. त्या ठिकाणी क्रेन मागून बंद पडलेला जेसीबी रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम पोलिसांनी केले.
समन्वयाचा अभाव
रस्त्यावर खोदकाम करताना पथ विभाग, वाहतूक पोलिस आणि संबंधित विभागामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू करण्यापूर्वी या विभागांनी एकमेकांना पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. संयुक्त बैठकीमध्ये यावर एकमतही झाले आहे. पण अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून समन्वय न ठेवता प्रत्येक विभाग आपापल्या पद्धतीने काम करत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पुन्हा तीच चूक
यापूर्वीदेखील महापालिकेच्या कारभारामुळे अशी कोंडी झाली होती. राजाराम पुलाची डागडुजी करण्यासाठी सकाळी गर्दीच्या वेळी काम करण्यास सुरुवात झाली आणि नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. हा अनुभव असतानादेखील बुधवारी सकाळी महापालिकेने पुन्हा तीच चूक केली. याचा अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
जलवाहिनी टाकण्याचे काम रात्रभर सुरू होते. शेवटी राडारोडा बाजूला करण्याचे काम सुरू असताना जेसीबीची बॅटरी बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यापुढे अशा पद्धतीने काम करता पोलिसांना पूर्वकल्पना दिली जाईल.
- सुहास महेंद्रकर, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
विश्रांती चौकात पाणीपुरवठा विभागातर्फे काम केले जाणार असल्याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. वाहतूक पोलिसांनी क्रेन मागून हा जेसीबी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे. महापालिकेकडून कोणतेही काम केले जात असताना समन्वयासाठी त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.
- सुनील गवळी, पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक शाखा
मी अकरावीचा विद्यार्थी आहे. सकाळी आमचा क्लास असतो. आनंदनगर भागातून कर्वे रस्त्याला जाण्यासाठी आम्ही निघालो. परंतु आनंदनगर चौक ते राजाराम पूल या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे इतका उशीर झाला की क्लासला जाणे शक्य झाले नाही.
- ईशान पाटील, विद्यार्थी
राजाराम पूलमार्गे पेठ भागात जायचे होते. मात्र आनंद नगर चौकाच्या आधीच वाहतूक कोंडी होती म्हणून पुलावरून दांडेकर पूलमार्गे जाण्यासाठी गाडी वळवली तर तिथेही वाहतूक कोंडी होती. बुधवारी कार्यालयात पोचण्यास पन्नास मिनिटे उशीर झाला. या सगळ्याची भरपाई महापालिका करून देणार का? महापालिकेचा नेहमीच ढिसाळ कारभार का होतो?
- कविता फडके, धायरी
आवाहन
रोज या ना त्या कारणामुळे महापालिकेच्या कारभाराचा फटका पुणेकरांना बसत आहे. ठेकेदारांकडून ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे आधीच वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. त्यात सिंहगड रस्त्यावर बुधवारी सकाळी सकाळी झालेल्या प्रकारामुळे विद्यार्थी व कामावर जाणाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यासंबंधी आपली मते ‘सकाळ’ला कळवावीत.

