आमदारांनी उघडले पसंतीच्या उमेदवारांचे पत्ते, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय
पुणे, ता. २४ ः पुणे महापालिका निवडणुकीतील उमेदवार निश्चित केले जात असताना भाजपमध्ये स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता काही पक्ष प्रवेश करून घेण्यात आल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत वादावादी झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर आज भाजपच्या कोअर कमिटीने प्रत्येक आमदारांसोबत अर्धा ते एक तास स्वतंत्रपणे चर्चा करून प्रभागातील उमेदवारांबाबत मते जाणून घेतली. त्यांची नाराजी दूर करतानाच
प्रत्येक प्रभागातील आमदारांची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे, हे जाणून घेण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतील इच्छुक उमेदवारांसाठी आमदारांसोबत चर्चा झाली.
या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असली तरी यावर उमेदवारांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम करणार आहेत. यासाठी गुरुवारी मुंबईत बैठक होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांची यादी तयार करण्यापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आपटे रस्त्यावरील एक तारांकित हॉटेलमध्ये दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरु होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरु झाली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार यादी अंतिम करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ज्या ठिकाणी विरोधी पक्ष ताकदवान आहे, तेथे अन्य पक्षातील उमेदवारांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. आतापर्यंत खडकवासला, वडगाव शेरी, कसबा, कोथरूड, हडपसर या मतदारसंघातील प्रभागांसाठी बाहेरच्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांना पक्षात घेतले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले आहेत. आणखी काही प्रवेश प्रलंबित असल्याने गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रवेशावरून पुण्यातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे पडसादही उमटले आहेत. प्रवेश झालेले माजी नगरसेवक वरचढ ठरणार असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
प्रत्येक प्रभागातून चार नावे
शहरात आठ विधानसभा मतदार संघ तर पिंपरी चिंचवडमध्ये तीन मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघातील कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असला पाहिजे, हे समजून घेण्यासाठी स्थानिक आमदारांकडून, जिथे आमदार नाही तेथे प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक प्रभागातून चार नावे मागविण्यात आली. त्याची बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकणे अवघड आहे अशा ठिकाणी बाहेरचा कोणता उमेदवार आयात केला पाहिजे, चार उमेदवारांचे पॅनेल कसे तयार करावे यावर सविस्तर चर्चा झाली आहे. ज्या नावांवर मतभेद नाहीत किंवा एकमत आहे अशा नावांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. प्रदेशच्या बैठकीत त्यास मान्यता घेतली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस प्रत्येक नावावर वैयक्तिक लक्ष घालून नावे अंतिम करणार आहेत. जिथे वाद नाहीत, अशांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणही ठरवणार भवितव्य
भाजपने अतिशय गुप्तपणे प्रत्येक प्रभागात कोणता उमेदवार सक्षम आहे, याचे सर्वेक्षण केले आहे. आमदारांनी दिलेली नावे, कोअर कमिटीकडे असलेली नावे याची चर्चा केली जाणार आहे. आमदारांच्या यादीत असलेले नाव जर सर्वेक्षणात मागे पडलेले असल्याचे समोर आल्यास तेथे निवडून येण्याची क्षमता गृहीत धरून उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर होईपर्यंत नावातील सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच ज्या प्रभागात उमेदवारी कोणाला द्यावी यावरून मतभेद आहेत याचा निर्णय राज्यातील प्रमुख नेते घेणार आहेत.
विद्यमानांची उमेदवारी धोक्यात
भाजपचे शहरात ९९ नगरसेवक होते. त्यातील जवळपास ४० ते ४५ जणांची उमेदवारी धोक्यात आली आहे. यात कसबा, कोथरूड, खडकवासला या मतदारसंघात अनेक नवे उमेदवार बघायला मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजपने अनेक मातब्बर माजी नगरसेवकांचा प्रवेश केलेला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये निवडून आलेल्या काही माननीयांचा पत्ता कट होणार
आहे. तसेच काही ठिकाणी आरक्षीत जागा नसणे, महिलेला उमेदवारी द्यावी लागणे, पक्षांतरामुळे समीकरणे बदलणे यामुळे काही इच्छुकांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागणार आहे, असे भाजपमधील पदाधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.
‘‘पुणे आणि पिंपरीतील विधानसभानिहाय जागांची चर्चा झाली. शिवसेना, ‘रिपाइं’ला किती जागा द्यायच्या यावर चर्चा केली. आमदारांची मते जाणून घेतली आहेत. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल."
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

