पिंपोडे बुद्रुक रब्बी हंगाम अडचणीत

पिंपोडे बुद्रुक रब्बी हंगाम अडचणीत

Published on

पाणीपातळी खालावल्याने रब्बीची पिके वाळू लागली

कोरेगावच्या उत्तर भागातील स्थिती; पिंपोडे बुद्रुक, तडवळे, सोनके, करंजखोप विहिरी खालावल्या

राहुल लेंभे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपोडे बुद्रुक, ता. २७ : कोरेगावच्या उत्तर भागात परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली असून, रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत. डिसेंबर महिन्यातच पाण्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे उन्हाळा कसा जाणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
राज्यात यंदा सर्वदूर चांगला पाऊस झाला. जवळपास चार महिने पाऊस बरसला. विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, पिंपोडे परिसरात परतीच्या पावसाने हुलकावणी दिली. पावसामुळे शेतकऱ्यांनी ऊस, आले, स्ट्रॉबेरी, ज्वारी, गहू, घेवडा, हरभरा, कांदे, तसेच तरकारी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी या पिकांना विहिरीतील पाणी देऊन जगवले. मात्र, आता विहिरींनी तळ गाठला आहे. पिंपोडे बुद्रुक, तडवळे, भावेनगर, नांदवळ, सोळशी, नायगाव, रणदुल्लाबाद, सोनके, करंजखोप, मोरबेंद या गावातील बहुतांश शेती जिरायती असून, विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यामुळे आता विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पिके जोमदार आहेत. ज्वारी पोटऱ्यात आली आहे. त्यामुळे आता पाण्याची अधिक आवश्यकता आहे; परंतु वाठार-सोळशी रस्त्याच्या उत्तरेकडील भागात पाणीपातळी खालावली असून, पिके जगवायची कशी? असा प्रश्न पडला आहे.

कोट -
आमच्या विहिरीत पाण्याचा टिपका नाही. ज्वारीचे बाटूक झाले असून, वाळलेले पीक जनावरे, शेळ्या- मेंढ्यांना चारून टाकले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चारा-पाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. दर दोन वर्षांनी पाणीटंचाई पाठ सोडत नाही. दुष्काळ आम्हाला चार वर्षे मागे घेऊन जातो. सरकारने आता तरी या भागाचा पाणीप्रश्न तातडीने सोडवला पाहिजे.
- चंद्रकांत पिसे, शेतकरी, भावेनगर.

चौकट -
-----------

पाटाच्या खोलीकरणासाठी इशारा
नांदवळ लघुपाटबंधाऱ्यातून रब्बी हंगामाला पाण्याचे आवर्तन सोडले जाते. त्याचा लाभ नांदवळसह सोनके, जगतापनगर व पिंपोडे बुद्रुक या चार गावांमधील ५०० एकर शेतीला होतो. पाटबंधारे विभागाने पाट दुरुस्ती न केल्यामुळे पाटाचा भराव फुटून पाणी वाया जात आहे. दर वर्षी केवळ दिखाव्यासाठी दुरुस्ती केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ''धरण उशाला आणि कोरड घशाला,'' अशी अवस्था झाली आहे. या पाटाचे खोलीकरण व अस्तरीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. येत्या चार दिवसांत हे काम न केल्यास आंदोलनाचा इशारा छप्पन साळुंखे यांनी दिला आहे.

01572
भावेनगर ः विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्याअभावी ज्वारीच्या पिकाचे बाटूक झाले आहे. (राहुल लेंभे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com