सुकाणू समितीने बनविला ‘कृती आराखडा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकाणू समितीने बनविला ‘कृती आराखडा’
सुकाणू समितीने बनविला ‘कृती आराखडा’

सुकाणू समितीने बनविला ‘कृती आराखडा’

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने सुकाणू समितीने सांगितलेल्या सूचनांनुसार काम करावे, तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी तयार राहावे, असे आवाहन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या सुकाणू समितीच्या कार्यशाळेत डॉ. देवळाणकर बोलत होते. ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते. या कार्यशाळेत समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय धांडे, विद्यापीठातील अधिष्ठाता उपस्थित होते.
डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अनुषंगाने आमची सर्व तयारी झाली आहे. ॲकॅडमिक क्रेडिट बँकेसाठी चार लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ८४ देशांसोबत शैक्षणिक कार्यक्रमातून जोडले गेलो आहोत, डिजी लॉकरवर नऊ लाख पदव्या अपलोड केल्या आहेत.’’
डॉ. धांडे म्हणाले, ‘‘देश स्वतंत्र झाला त्यावेळी लोकसंख्या ४० कोटी होती, आता ती १४० कोटींवर गेली आहे, तरीही आपली शिक्षण व्यवस्था तीच आहे. शिक्षण व्यवस्थेवर भारही वाढत आहेत. खरंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ असायला हवे.’’

कार्यशाळेतील महत्त्वाचे मुद्दे
- सर्व विद्यापीठांच्या माहितीसाठी एफएक्यू करणार
- कामाचा आवाका जाणून घेण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये उपक्रम राबविणार
- ॲकॅडमिक कॅलेंडर तयार करणार
- पुढील सभा जळगाव येथे होणार