पठाण नवा चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पठाण नवा चित्रपट
पठाण नवा चित्रपट

पठाण नवा चित्रपट

sakal_logo
By

नवा चित्रपट
पठाण
तुफान ॲक्शनला देशप्रेमाची फोडणी!
- महेश बर्दापूरकर

शाहरुख खाननं गेल्या काही चित्रपटांच्या तुलनेत पूर्णपणे बदललेला लुक, हॉलिवूडला आडून-आडून कॉपी करण्यापेक्षा थेट तसाच, अगदी बॉण्डपटांना साजेसा प्लॉट आणि ॲक्शन, दर काही मिनिटांनी ‘भारतमाते’बद्दल काढलेले गौरवोद्गार आणि पाकिस्तानची उडवलेली खिल्ली, मध्येच सलमान खानला आणून कथेला दिलेला ‘बुस्टर डोस’, एखादा मिनिटही विचार करण्याची संधी न देणारं तुफान वेगवान कथानक, बॉण्ड गर्लशी टक्कर देणारी दीपिका आणि तिचं गाणं....‘पठाण’ या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाची ही शब्दांत न मावणारी वैशिष्ट्यं...हा चित्रपट अडीच तास पुरेसं समाधान देत असला, तरी लक्षात मात्र राहात नाही. हिंदी चित्रपटसृष्टीला सध्या हवा असलेला सुपरहिट चित्रपट ‘पठाण’ आहे, असे संकेत देण्यातही चित्रपट यशस्वी ठरत नाही...
आपला नायक पठाण (शाहरुख खान) ‘रॉ’चा एजंट आहे आणि वेगवेगळ्या कारणानं या संघटनेमधून बाहेर पडलेल्यांची एक वेगळी संघटना त्यानं बनवली आहे. त्याला साथ देणारी त्याची बॉस (डिंपल कापडिया) आणि कर्नल लुथ्रा (आशुतोष राणा) यांच्या आदेशानुसार, तर कधी त्यांना न जुमानता पठाण दुश्‍मनांचा खातमा करीत सुटला आहे. भारतानं ३७० कलम रद्दबातल केल्यानं दुखावलेला पाकिस्तान एक भयानक योजना आखतो आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो जीम (जॉन अब्राहम) हा ‘रॉ’चाच दुखावलेला माजी एजंट. त्याला साथ असते रुबिना (दीपिका पदुकोण) या पाकच्या आयएसआय एजंटची. आता हा थेट सामना आहे पठाण आणि जीम यांच्यातील. रेल्वेत, बर्फावर, मोटर सायकलवर, मोडक्या घरात, हेलिकॉप्टरमध्ये...अशा विविध ठिकाणी हाणामाऱ्या होतात, अस्त्रं आणि शस्त्रं वापरली जातात, रक्तपात होतो, देशप्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात आणि शेवटी एकदाचा देश परकीय कटापासून मुक्त होतो...
‘पठाण’ची कथा भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, फ्रान्स, स्पेन अशा विविध देशांत एकाच वेळी फिरत राहते. मध्येच फ्लॅशबॅक येतात, कथेत तुफान ट्विस्ट येतात, नायक त्याच्या जुन्या चित्रपटांतील संदर्भ देत हसं वसूल करतो, अगदी मृत्यूच्या दाढेत गेल्यानंतर ‘टायगर’ येऊन त्याला वाचवतो (वर माझ्या चित्रपटातही ये, असं आमंत्रण देऊन जातो), ‘रॉ’ आणि ‘आयएसआय’ मानवतेच्या (!) भल्यासाठी चक्क एकत्र काम करतात, कोरोनाचा संदर्भ देत बायोलॉजिकल वॉरच्या धमक्या दिल्या जातात, नायकाला दर काही मिनिटांनी हाणामारीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पठाण ‘लावरिस’चा ‘खुदा गवाह’ कसा झाला याची गोष्ट सांगत ‘सर्वधर्मसमभावाचा’ डोसही मिळतो. कथेचा शेवटही तुफान ॲक्शननं होतो. मात्र, बाहेर पडल्यावर यातलं काहीही लक्षात राहात नाही. याचं कारण कदाचित हे सर्व काही प्रेक्षकांनी याआधी कुठंतरी पाहिलेलं आहे, त्याचं पॅकेजिंग एकाच ठिकाणी केल्यानं चित्रपट अविस्मरणीय ठरत नाही. सर्वांगसुंदर ‘पठाण’मध्ये हीच कमतरता राहून जाते...
शाहरूख खाननं आपला करिष्मा कायम ठेवला असून, जोश, उत्साह आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात तो कुठंही कमी पडत नाही. नव्या लुकमध्ये तो अधिक हॅण्डसम दिसतो व ॲक्शन आणि प्रेमाच्या प्रसंगांमधील त्याची जादू अद्याप कायम असल्याचं स्पष्ट होतं. दीपिकानं साकारलेली ग्लॅमर व ॲक्शनचा मिलाफ असलेली रुबिना परफेक्ट. नकारात्मक भूमिकेत जॉन अब्राहम लक्षात राहतो. डिंपल कापडिया, आशुतोष राणा आदी कलाकारांना पुरेशी संधी मिळत नाही.
----