कसब्यात मतदार घटले; चिंचवडमध्ये वाढले २०१९ च्या तुलनेत पंधरा हजारांची घट तर ४८ हजार मतदारांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसब्यात मतदार घटले; चिंचवडमध्ये वाढले
२०१९ च्या तुलनेत पंधरा हजारांची घट तर ४८ हजार मतदारांची वाढ
कसब्यात मतदार घटले; चिंचवडमध्ये वाढले २०१९ च्या तुलनेत पंधरा हजारांची घट तर ४८ हजार मतदारांची वाढ

कसब्यात मतदार घटले; चिंचवडमध्ये वाढले २०१९ च्या तुलनेत पंधरा हजारांची घट तर ४८ हजार मतदारांची वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांत २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत कसब्यात १५ हजार मतदार कमी झाले आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात ४८ हजार मतदार वाढले आहेत.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांतील मतदारसंख्येचा आढावा घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसब्यात १ लाख ४४ हजार १२४ पुरुष, तर १ लाख ४६ हजार ५५२ महिला मतदारांची संख्या होती. तृतीयपंथी मतदारांची संख्या केवळ चार होती. जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच (५ जानेवारी) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. हीच यादी दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. त्यानुसार कसब्यात १५ हजार २५५ मतदार घटले आहेत. त्यामध्ये ७ हजार २५४ पुरुष, तर ८ हजार २ महिला मतदार आहेत. त्यामुळे नव्या मतदारयादीनुसार कसब्यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार ८७३, तर महिला मतदारांची संख्या १ लाख ३८ हजार ५५० झाली आहे. तर पाच तृतीयपंथी मतदार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदार संघात २०१९ मध्ये ५ लाख १८ हजार ३०९ मतदार होते. अंतिम मतदारयादीनुसार ४८ हजार १०६ मतदार वाढले आहेत. त्यात पुरुष मतदार २५ हजार ३४४ आणि महिला मतदार २२ हजार ७५९ इतके वाढले आहेत, तर तृतीयपंथी मतदार केवळ तीन वाढले असून, या मतदारांची संख्या ३५ झाली आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार झाली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी दिली.

दरम्यान, या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी भुसावळ येथून १ हजार ७२० मतदान यंत्रे (ईव्हीएम) दाखल झाली आहेत. ही मतदान यंत्रे भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. या यंत्रांच्या तांत्रिक तपासणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या अधिकाऱ्यांकडून मतदानयंत्रांची तपासणी करण्यात येत असून, या वेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनादेखील बोलविण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.

मतदानाच्या तारखेत बदल
बारावी आणि पदवी परीक्षेमुळे मतदानाच्या दिवसात बदल करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. ती विचारात घेऊन निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. आयोगाच्या आदेशानुसार पूर्वी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार होते. नव्या बदलानुसार आता २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसे आदेश आयोगाकडून गुरुवारी देण्यात आले.

निवडणुकीचे वेळापत्रक
उमेदवारी अर्ज : ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२३
उमेदवारी अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी २०२३
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी २०२३
मतदान : २६ फेब्रुवारी २०२३
मतमोजणी : २ मार्च २०२३