
बसच्या धडकेने दोन महिलांचा मृत्यू
पुणे, ता. २५ : भरधाव खासगी बसची धडक बसल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथील राजेंद्र पेट्रोल पंपासमोर मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली.
या संदर्भात मारुती मुळे (वय ४५, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण सुरेखा नरसिंग सूर्यवंशी (वय ३५, रा. खंडाळ, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि मावशी मम्मादेवी मारुती सूर्यवंशी (रा. गंगानगर, गुलबर्गा, कर्नाटक) या पेट्रोल पंपासमोरील रस्त्याने जात होत्या. त्यावेळी यांना एका खासगी बसची जोरदार धडक बसली. त्यात सुरेखा आणि मम्मादेवी यांच्या डाव्या हातास आणि डोक्याला गंभीर जखम झाली. त्यात सुरेखा आणि मम्मादेवी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.