
सरपंचांनी गरजांनुसार विकासाचे नियोजन करावे कार्यशाळेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना
पुणे, ता. २८ : केंद्र आणि राज्य सरकारकडून गावांच्या विकासासाठी विविध योजनांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपैकी ८५ टक्के निधी हा थेट ग्रामपंचायतींना मिळत असतो. गावच्या विकासासाठी कोणती योजना आणावी, याची माहिती सरपंचांना असायला हवी. यानुसार सरपंचांनी गावच्या गरजांनुसार विकासाचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २७) जिल्ह्यातील सरपंचांना केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सरपंचांसाठी संकल्प २०२३-हर घर नल से जल या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी आमदार उमा खापरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटी रुपयांची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे. दरम्यान, येत्या दोन वर्षांत केंद्र सरकार देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचविण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत १ हजार ३५४ गावांत पाणी योजना निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्याला आतापर्यंत २९९ कोटींचा निधी मिळाल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. या वेळी घर घर जल म्हणून घोषित झालेल्या गावातील सरपंचांचा आणि या योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.