पूर्व भागातील कामाला अजून विलंबच पुणे महापालिका ः समान पाणी पुरवठा योजनेला पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व भागातील कामाला अजून विलंबच

पुणे महापालिका ः समान पाणी पुरवठा योजनेला पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार
पूर्व भागातील कामाला अजून विलंबच पुणे महापालिका ः समान पाणी पुरवठा योजनेला पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार

पूर्व भागातील कामाला अजून विलंबच पुणे महापालिका ः समान पाणी पुरवठा योजनेला पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील एक वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मात्र, लष्कर केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शहराच्या पूर्व भागातील काम पूर्ण होण्यास २०२६ उजाडणार आहे. या भागात ३५९ किलोमीटर लांबी जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यापैकी आत्ता केवळ ४२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर एकही मीटर बसवलेले नाही. त्यामुळे समान पाणी पुरवठा योजनेच्या विलंबाचा नवा विक्रमच होणार आहे.

शहरात असमान पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेने २,४५० कोटी रुपयांची समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. २०१७ ला या योजनेचे काम सुरू झाले असले तरी प्रशासकीय दिरंगाई, नगरसेवकांचे असहकार्य आणि कोरोनामुळे २०२२ अखेरपर्यंत ६० टक्केच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करू, असा दावा केला जात आहे. पण, या योजनेच्या भाग चारचे काम पूर्ण होण्यासाठी २०२६ उजाडणार आहे.

यामुळे काम रखडले
- समान पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी शहराचे पाच भाग
- भाग एक, दोन, तीन आणि पाच या चार भागाचे काम सुरू
- भाग चारचे काम वेळेत न केल्याने महापालिकेने या संबंधित ठेकेदार कंपनीला दंड,
- काम काढून घेतले.
- याविरोधात कंपनीने लवादात याचिका दाखल
- महापालिकेच्या विरोधात निकाल दिल्याने दंड माफ करून पुन्हा काम सुरू करण्याचे आदेश
- या वादात सुमारे अडीच वर्ष भाग चारचे काम रखडले
- एप्रिल २०२२ पासून काम पुन्हा सुरू
- गेल्या नऊ महिन्यांत २५ झोनपैकी पैकी एका झोनचे काम पूर्ण

खराडीतील १८ किलोमीटरची जलवाहिनी
खराडीभागात पीपीपीद्वारे रस्ते केले जाणार आहेत. एकदा रस्ते केल्यानंतर पुन्हा जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्याची नामुष्की येऊ नये, यासाठी पाणी पुरवठा विभागातर्फे खराडी भागात १८ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. भाग चारमध्ये लष्कर पाणी पुरवठा केंद्राचा भाग येतो. त्यामध्ये पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या भागाचा समावेश होतो.


समान पाणी पुरवठा योजनेच्या भाग चारचे काम एका खासगी कंपनीकडे आहे. यामध्ये कंपनी लवादात गेल्याने काम होऊ शकले नव्हते. आता पुन्हा नव्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात खराडीत १८ किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार आहे. हडपसर, कोंढवा, खराडी या भागातील योजनेचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन वर्ष लागणार आहेत.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

भाग चारमध्ये असे होणार काम
-एकूण खर्च ४१५ कोटी
-जलवाहिन्यांची लांबी - ३५९ किलोमीटर
-नव्याने टाकलेली जलवाहिनी - ४२ किलोमीटर
-बसविण्यात येणाऱ्या मीटरची संख्या - ४९०४४
-कामाची मुदत - एप्रिल २०२२ पासून ४८ महिने
- पाण्याच्या टाक्यांची संख्या -२१