कुलगुरू निवडीसाठी समित्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलगुरू निवडीसाठी समित्या
कुलगुरू निवडीसाठी समित्या

कुलगुरू निवडीसाठी समित्या

sakal_logo
By

पुणे, ता. ३०ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी नव्याने स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत. मुंबई विद्यापीठासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांची समिती गठित करण्यात आली आहे.
डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ मे २०२२ मध्ये संपला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबर २०२२ मध्ये नियुक्त करण्यात आली. त्यानंतर जवळपास दीड महिन्याने कुलगुरू शोध समितीने विद्यापीठामार्फत जाहिरात प्रसिद्ध करत १४ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. मात्र, शोध समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) सदस्य नसल्याने समितीची नव्याने रचना करणे अपेक्षित होते. अखेरीस दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंततर सोमवारी राज्यपाल कार्यालयाने ट्वीट करत नव्या समितीची माहिती दिली.