
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन
पुणे, ता. ४ : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी विभागाच्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या वर्षी प्रदर्शनासाठी राज्यातील ४४२५ विद्यार्थ्यांनी एकूण ६५१७ कलाकृती राज्य कला प्रदर्शनासाठी पाठवून प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी मिश्रा म्हणाले, ‘‘कला संचालनालय असलेले महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य असून संचालनालयातर्फे शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित कला संस्थांमध्ये विविध कलाविषयक अभ्यासक्रम राबविले जातात. या शिक्षणाचा लाभ घेणाऱ्या कलेच्या विद्यार्थ्यांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने विद्यार्थी विभागासाठी शासनातर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी एकूण ६५१७ कलाकृती राज्य प्रदर्शनासाठी पाठविल्या. त्यातून ८०२ कलाकृतींची निवड करण्यात आली. दरम्यान हे प्रदर्शन येत्या गुरुवारपर्यंत (ता. ९) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सातारा रस्ता येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.’’