
व्यक्तिनिर्माणात शिक्षकांचा सिंहाचा वाटा मनीष कोल्हटकर; एनआयई आणि एमटेक इंजिनिअर्सच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
पुणे, ता. ४ : आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती लक्षात राहत नाही. पण आपले पहिली ते दहावीचे शिक्षक नेहमी लक्षात राहतात. कारण, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो, असे मत एमटेक इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक मनीष कोल्हटकर यांनी आज येथे व्यक्त केले.
सकाळ एनआयई व एमटेक इंजिनिअर्स यांच्या वतीने ‘शालेय शिक्षकांनी असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे वृत्तसंपादक धनंजय बिजले, ‘सकाळ’ प्रशासनाचे वरिष्ठ व्यवस्थापक राम शेळके उपस्थित होते. कोल्हटकर म्हणाले, ‘‘एनआयईच्या माध्यमातून आजवर शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांचा माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या आजच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.’’
राज्यभरातील ६५० पेक्षा अधिक शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद, महापालिका, प्राथमिक व माध्यमिक शाळा या गटांनुसार शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. एकूण ४७ शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली. सांगलीतील शौर्य पाटील या लहान मुलाने क्रांतिकारकांची कथा सांगत उपस्थितांची मने जिंकली. एनआयईचे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.
22689