
गुन्हे वृत्त
फुगे विकणारी तीन मुले बेपत्ता
पुणे : जंगली महाराज रस्त्यावर एका फुगे विक्रेत्या महिलेची तीन मुले अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आयना शंकर काळे (वय ३५) हिने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला जंगली महाराज रस्त्यावर फुगेविक्री करून उदरनिर्वाह करते. तिची जनाबाई (वय १०), दत्तू (वय ७), आरती (वय ५) ही तीन मुले फुगे विक्री करून आईला मदत करतात. मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.
घरात घुसून सासू-सुनेचे दागिने हिसकावले
पुणे : सहा महिन्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत चोरट्यांनी सासू-सुनेचे एक लाख ८० हजारांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना कोंढवा भागातील मिठानगरमध्ये भरदिवसा घडली. या बाबत एका ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येथील चेतना गार्डन सोसायटीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास दोन चोरटे घरात शिरले. त्यावेळी ज्येष्ठ महिलेने चोरट्यांना प्रतिकार केला. परंतु चोरट्यांनी तिच्या सहा महिन्यांच्या नातवाला जिवे मारण्याची धमकी दिली. ज्येष्ठ महिलेच्या सोन्याच्या बांगड्या आणि सुनेचे मंगळसूत्र असा सुमारे एक लाख ८० हजारांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले.
ज्येष्ठ नागरिकाची एक कोटींची फसवणूक
पुणे : तरुणीसोबत मैत्रीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रजत सिन्हा, नेहा शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे ते एकटेच राहत होते. नेहा शर्मा या तरुणीने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींसोबत मैत्रीची संधी मिळेल. तसेच, विवाह करण्याचे आमिष दाखवून या तरुणीने ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी एक कोटी रुपये उकळले.