
काँग्रेसचा ‘हात’ धंगेकरांच्या मागे!
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी शक्तीप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून सतरा जण इच्छुक होते. गेले दोन दिवस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शहरात ठाण मांडून बसल्यानंतरही उमेदवार जाहीर होत नव्हता. या पार्श्वभूमीवर पक्षाचा उमेदवार सोमवारी अर्ज भरणार, असे संदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रविवारी रात्रीच पाठविण्यात आला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. दरम्यान सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ट्विट धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केली. ग्रामदैवत कसबा गणपतीजवळ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास गोळा होऊ लागले. थोड्याच वेळात धंगेकर तेथे आले. त्यानंतर पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण तसेच विश्वजित कदम, संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, कमल व्यवहारे, अभय छाजेड, दीप्ती चवधरी यांच्यासह शहराचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, दीपक मानकर, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेनेचे युवराज पारिख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होते. ढोल, फटक्यांच्या आतषबाजीत आणि जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर कसबा गणपतीची आरती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करून धंगेकर उमेदवारी अर्ज दाखल केला.
...म्हणून उमेदवारी जाहीर करण्यास उशीर
चिंचवड विधानसभा मतदार संघातील जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कसब्यातील उमेदवारी जाहीर न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. अखेर कालरात्री या संदर्भातील तिढा सुटला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून चिंचवडमधील तर काँग्रेसकडून धंगेकर यांचे नाव जाहीर झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली.
पक्षातील नाराजी डोकेदुखी ठरणार
कसब्यातील जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला आली. परंतु काँग्रेसला पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यात अद्याप यश आले नसल्याचे धंगेकर यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या रॅलीवरून समोर आले. या रॅलीला माजी मंत्री रमेश बागवे आणि पक्षाकडून इच्छुक असलेले एक उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. कसब्याची जागा पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे एकीकडे काँग्रेस नेते सांगत असताना दुसरीकडे पक्षातील नाराजी डोकेदुखी ठरणार असल्याचे या निमित्ताने समोर आले.
धंगेकर यांचा परिचय
धंगेकर हे मूळचे शिवसैनिक. १९९७, २००२ आणि २००७ च्या महापालिका निवडणुकीत ते शिवसेनेकडून विजयी झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर २०१२ मध्ये ते मनसेकडून महापालिकेवर निवडून आले. या दरम्यान २००९ आणि २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत ते मनसेचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी जोरदार लढत दिली होती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करीत महापालिकेत प्रवेश केला. आता काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
---------